धोक्याची घंटा; 'फ्लडिंग हॉटस्पॉट'च्या प्रभावाखाली ३५ टक्के मुंबईकर

Global warming
Global warminggoogle

मुंबई : ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) अर्थात जागतिक तापमान वाढीचा (World Temperature) मुंबईला धोका असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. गेल्या काही वर्षात शहरातील प्रदूषण वाढत (Pollutions) आहे. त्याचबरोबर उष्णतेतही वाढ होत असून, पूरप्रवण क्षेत्र तसेच भूस्खलनाच्या (landslide) घटनांमध्ये गेल्या दशकात झालेली वाढ चिंताजनक आहे. गेल्या ४७ वर्षांत (१९७३ ते २०२०) मुंबईतील तापमानाचा अभ्यास केल्यास प्रतिदशक ०.२५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

Global warming
मुंबई : आंगडिया व्यापाऱ्याकडून खंडणी; आयपीएस अधिकारी फरार

मुंबई महापालिकेने वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय) इंडिया आणि सी-४० सिटीज नेटवर्क यांच्या तांत्रिक सहाय्याने पहिला मुंबई वातावरण कृती आराखडा (एमकॅप) मांडला. यात ग्लोबल वॉर्मिंगचा फटका मुंबईच्या संरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या कांदळवनांना बसल्याचे समोर आले आहे. सॅटेलाईट इमेजवरील विश्लेषणाच्या आधारे २००५ ते २०२१ या कालावधीत ३२५ हेक्टरवरील कांदळवनांचे घनदाट आच्छादन आता विरळ झाले आहे. बऱ्याच ठिकाणी धूप झाल्याने भरती-ओहोटी क्षेत्रातील चिखलक्षेत्रात बदल झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईला वेगवेगळ्या प्रकारच्या पुराचा धोकादेखील वाढला आहे. पालिकेने नोंदवलेल्या फ्लडिंग हॉटस्पॉटच्या प्रभावाखाली (२५० मीटर त्रिज्येच्या बफरमध्ये) ३५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या राहते.

प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याने विळखा आणखी घट्ट होत आहे. वातावरणातील पार्टिक्यूलेट मॅटरची अर्थात द्रव्यकणांची (पीएम २.५ आणि पीएम १०) वार्षिक सरासरी घनता ही राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकांच्या वर घातक पातळीवर पोहोचली आहे. २०१० आणि २०२० या दरम्यान हवा गुणवत्ता सयंत्रांनी नायट्रोजन डायऑक्साईडची घनता वार्षिक मान्यता पातळीच्या ४० यूजी/एम-३ पलिकडे नोंदवली आहे. वातावरण बदलांच्या धोक्यांनी प्रभावित होणारे महिला, वृद्ध, अपंग व्यक्ती, लहान मुले, अल्प उत्पन्न समाज आणि कामगार यांसारख्या समुदायांची नोंद करून अशांसाठी वातावरण बदलाचे धोके कमी करणाऱ्या विशेष उपाययोजना आणि अनुकूलता धोरण सुचवण्यात आले आहे.

Global warming
विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी का भडकावले? हायकोर्टाने हिंदुस्थानी भाऊला फटकारले

हे प्रभाग असुरक्षित
१) ‘एम पूर्व’ प्रभाग हा उष्णतावाढीच्या अनुषंगाने सर्वाधिक असुरक्षित विभाग असून, ४० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला पृष्ठभागावरील ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाचा सामना करावा लागत आहे.
२) एफ उत्तर प्रभागामध्ये ५४ फ्लडिंग हॉटस्पॉट असल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये २८७ भूस्खलनप्रवण ठिकाणे असून त्यापैकी २०९ ठिकाणच्या वसाहती या अस्थिर संरचनेच्या आणि असुरक्षितता वाढविणाऱ्या आहेत.

सर्वसमावेशक आणि कार्बन उत्सर्जन कमी असलेल्या शहरी विकासाच्या माध्यमातून आगामी काळाकडे वाटचाल करण्यासाठी मुंबई वातावरण कृती आराखड्यावर भर देत आहोत. या माध्यमातून नव्याने वातावरण विभाग स्थापन करणे, हरितगृह वायूंचे स्रोत निश्चिती आणि सद्यस्थितीचा आढावा घेण्यास मदत होणार आहे.
- इकबाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका

मुंबई महापालिकेने वातावरण बदलाशी लढणे आणि बदलत्या वातावरणानुसार क्षमता वाढविणे, यावर लक्ष केंद्रित केले आहे. वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शहराची धोरणे आणि उपक्रम यासाठी एमकॅप रोडमॅपप्रमाणे काम करेल.
- डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त आयुक्त (शहर)

मुंबईवर ग्लोबल वॉर्मिंगचा गंभीर परिणाम होत आहे. मुंबईत सुरू असलेले समुद्री मार्ग, भूमिगत मेट्रो, सिमेंटची बांधकामे त्वरित थांबवायला हवीत. निसर्गाचा स्वतःचा विकास आराखडा आहे. आपल्या कृत्रिम आराखड्याने निसर्गाचे संरक्षण होणार नाही. ही सर्व धूळफेक आहे.
- डॉ. गिरीश राऊत, निमंत्रक, भारतीय जीवन आणि पृथ्वी चळवळ

क्षेत्रनिहाय प्रमुख धोरणे

ऊर्जा आणि इमारती
- मुंबईच्या ऊर्जापुरवठ्यात नवीकरणीय ऊर्जेचे प्रमाण २०३० पर्यंत ५० टक्के आणि २०५० मध्ये ९० टक्क्यांपर्यंत वाढविणे
- सध्या असलेल्या पायाभूत सुविधा अद्ययावत करणे आणि स्वच्छ इंधनाचा वापर करणे
- सध्याच्या इमारतींना हरित इमारतीसाठी रेट्रोफिटिंग करणे आणि नवीन इमारतींसाठी एनर्जी कन्झर्वेशन बिल्डिंग कोड कंप्लायन्स आणि तसे प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रोत्साहित करणे

कचरा व्यवस्थापन
- जमिनीवर परिणाम करणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण २०३० पर्यंत ४० टक्क्यांनी कमी करणे
- कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि कंपोस्टिंगद्वारे ८० टक्क्यांपर्यंत कचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण
- डम्पसाईटवर निरोगी इकोसिस्टिम व्हावी यासाठी वैज्ञानिक उपाय
- डम्पिंगसाईटसाठी उपाययोजना आणि २०३० पर्यंत १०० टक्के वैज्ञानिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट

वाहतूक
- मल्टिमॉडेल इंटिग्रेशन आणि मागणी व्यवस्थापन यांच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक सुधारणे
- यंत्रविरहित (नॉन मोटराईज्ड) वाहतूक सुविधांची उपलब्धता आणि त्यासाठी पायाभूत सुविधा सुधारणे
- हरितगृह वायूचे प्रमाण कमी करणे आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी २०५० पर्यंत विजेवर धावणाऱ्या दुचाकी, टॅक्सी आणि रिक्षा यांचे प्रमाण १०० टक्के करणे
- विजेवरील खासगी चारचाकींचे प्रमाण ९६ टक्के करणे.
- कमी कार्बन उत्सर्जन पर्यायांचा वापर करणे

शहरातील हिरवळ आणि जैवविविधता
- उष्णता आणि पुराची जोखीम हाताळण्यासाठी शहराचे हरित आच्छादन आणि पाणी झिरपू शकते, असा पृष्ठभाग २०३० पर्यंत ३० ते ४० टक्क्यांनी वाढविणे.
- २०५० पर्यंत उष्णतेचा परिणाम कमी करणे आणि शहरातील रस्त्यानजीकचा पाणी झिरपणारा पृष्ठभाग १०० टक्क्यांनी वाढवणे.
- खुल्या हरित जागांची उपलब्धत वाढवून २०४० पर्यंत दरडोई खुल्या जागेत सहा चौरस मीटरपर्यंत वाढ
- शहराची जैवविविधता पुन:स्थापित करणे आणि वाढविणे
- २०२५ पर्यंत स्थानिक पातळीवर जैवविविधता धोरण आणि कृती आराखडा, अधिवासाच्या ऱ्हासाचे जीआयएस मॅपिंग, जैवविविधता हॉटस्पॉटचे सीमांकन

हवा गुणवत्ता
- प्रदूषण पातळीवर अंकुश ठेऊन हवेची गुणवत्ता २०-३० टक्क्यांनी सुधारणे
- स्वयंपाकासाठी एलपीजी आणि पीएनजी वापरात २०२५ पर्यंत ४० टक्के आणि २०३० पर्यंत १०० टक्के परिवर्तन.

पूर आणि जल संसाधन व्यवस्थापन
- पूर सक्षम यंत्रणा आणि पायाभूत सुविधांची उभारणी करणे
- शहरातील पाण्याची ५० टक्के गरज २०३० पर्यंत स्थानिक पातळीवर जलसंधारण, संवर्धन करण्याची आणि कार्यक्षम वापराची हमी देणे
- जैवविविधतेचे संरक्षण, संवर्धन आणि पुनर्संचयित करण्यासाठी प्रदूषण कमी करणे
- २०३० पर्यंत सर्वांसाठी सुरक्षित आणि परवडणाऱ्या दरात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता
- २०३० पर्यंत सर्वांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि सहज उपलब्ध शौचालय उपलब्ध करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com