
Mumbai : ओएनजीसी ला ३८ हजार कोटी रुपये निव्वळ नफा
मुंबई - तेल आणि नैसर्गिक वायू उत्खनन क्षेत्रातील भारताची महारत्न कंपनी ओएनजीसी ला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ३८,८२९ कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे.कंपनीने प्रती शेअर ११.२५ रुपये लाभांश जाहीर केला आहे. कंपनीचे अध्यक्ष अरुण कुमार सिंह यांनी आज अन्य संचालकांसह आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पत्रकारांना ही माहिती दिली.
कंपनीचा यावर्षीचा निव्वळ नफा मागील वर्षीपेक्षा किंचित कमी असला तरी यावेळी त्यांनी वादग्रस्त कर तरतुदीसाठी बारा हजार कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे नफा कमी दिसतो असे सिंह म्हणाले. सरकारने यावेळी रॉयल्टीवर जीएसटी आकारल्याने तो वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तो निकाल आमच्या बाजूने लागला तर आमचा नफा वाढेल असेही त्यांनी सांगितले.
या वर्षभरात ओएनजीसीला दीड लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त (१,५५,५१७ कोटी रु.) महसूल मिळाला. त्यांचा इतर उपकंन्यांसह एकत्रित महसूल ६,९२,९०३ कोटी रुपये होता. कंपनीने या वर्षात ३०,२०८ कोटी रुपये भांडवली खर्च केला तर पुढील वर्षी हा खर्च ३०,१२५ कोटी रुपये होईल. नव्या तेल आणि वायू विहिरी खोदणे, तेल व नैसर्गिक वायू साठ्यांचे सर्वेक्षण, संशोधन आणि विकास तसेच अन्य प्रकल्पांमध्ये हा खर्च केला जाईल.
यावर्षी कंपनीने ४६१ विहिरी खणल्या. मागील वर्षी ही संख्या ४३४ एवढी होती. गेली पाच वर्षे कंपनी समाजसेवी उपक्रमांवर सीएसआर फंडातून दरवर्षी ५०० कोटी रुपये खर्च करत आहे. कंपनीच्या सीएसआर प्रकल्पामधून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण तसेच पुरातन वास्तु संवर्धन ही कामे प्रामुख्याने केली जातात.
देशाच्या सर्व महारत्न कंपन्यांच्या एकूण मालमत्तेच्या २५ % मालमत्ता ओएनजीसी कडे आहे. सध्या ओएनजीसी तर्फे विविध स्रोतांमधून १८९ मेगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मिती होत असून २०३० पर्यंत सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आदी मार्गाने दहा गिगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचे लक्ष आहे. ओएनजीसी विदेश चे १५ देशात ३२ प्रकल्प असून त्यांची कामगिरीही चांगली होत आहे.