मुंबईकरांना आता घेरले या रोगाने

बुधवार, 31 जुलै 2019

पावसाच्या पाण्यात भिजल्यानंतर... पावसात त्वचा कोरडी राहणे महत्त्वाचे ड्रेसिंग पावडर सातत्याने शरीराला लावणे कार्यालयात सुक्‍या कपड्यांचा जोड ठेवा पावसात चालताना जखमा झाल्या असतील तर त्या पाण्याने स्वच्छ करून जंतुनाशक मलम लावा पावसात भिजल्यानंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करा. मॉश्‍चरायझर किंवा मलम आवर्जून लावा.

मुंबई - पावसाळा म्हटले की विविध आजार आलेच. अनेक संसर्गजन्य आजारांचा सामना मुंबईकरांना करावा लागतो. एरवी मलेरिया, डेंगी, स्वाईन फ्लू आदींसारख्या आजाराने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना सध्या त्वचारोगाची समस्या भेडसावत आहे. ओले कपडे शरीरावर बराच काळ राहिल्याने नायटा आणि एक्‍झिमासारखे त्वचारोग शहरवासीयांमध्ये वाढताना दिसत आहेत.

यंदाच्या ऋतुमानात सध्या २५ टक्के रुग्ण वाढल्याची माहिती त्वचारोगतज्ज्ञांकडून दिली जात आहे. नायटाच्या त्रासाने साठ टक्के रुग्ण रोज दवाखान्याला भेट देत असल्याची माहिती त्वचारोगतज्ज्ञ डॉ. उदय खोपकर यांनी दिली. नायटामुळे दर दिवसाला नवे पाच रुग्ण दवाखान्याला भेट देत असल्याची माहिती त्वचारोगतज्ज्ञ डॉ. नितीन नाडकर्णी यांनी दिली. पावसाच्या पाण्यात भिजल्यानंतर अंगाला खाज सुटणे, ओल्या भितींच्या स्पर्शामुळे झालेला नायटा, डासांच्या तीव्र चाव्याने उमटलेले लालसर चट्टे आदींचा त्यात समावेश आहे. पावसात घाणीच्या पाण्यात सातत्याने राहिल्याने त्वचारोग होण्याची शक्‍यता जास्त असल्याची माहिती डॉ. उदय खोपकर यांनी दिली. केवळ नायटाच्या त्रासानेही रुग्णांची तक्रार वाढत असल्याची माहिती आहे.

शरीर जास्त काळ पावसाच्या पाण्यात ओले राहिल्यास त्वचारोग होण्याची शक्‍यता वाढते. त्यामुळे घरी पोहोचल्यावर निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याने आंघोळ करा. कार्यालयात गेल्यावरही स्वच्छ पाण्याने हातपाय धुऊन घ्या, असे आवाहन डॉ. खोपकर यांनी केले आहे.