मुंबई पोलिसांच्या ताफ्यात ऍण्टी ड्रोन यंत्रणा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

 मुंबई पोलिस आता ऍण्टी ड्रोन यंत्रणेने सज्ज झाले आहेत. सिंगापूरची ही यंत्रणा असून त्याद्वारे उडत्या ड्रोनवर नियंत्रण मिळवणे पोलिसांना शक्‍य होणार आहे. गणेश विसर्जनावेळी याचा वापर करण्यात आला होता. 

मुंबई - मुंबई पोलिस आता ऍण्टी ड्रोन यंत्रणेने सज्ज झाले आहेत. सिंगापूरची ही यंत्रणा असून त्याद्वारे उडत्या ड्रोनवर नियंत्रण मिळवणे पोलिसांना शक्‍य होणार आहे. गणेश विसर्जनावेळी याचा वापर करण्यात आला होता. 

ड्रोनची सिग्नल यंत्रणा 2.5 आणि 5.5 गेगाहर्टस्‌ या सिग्नल फ्रिक्वेन्सीवर चालते. या नव्या यंत्रणेच्या साह्याने उडत्या ड्रोनच्या सिग्नल यंत्रणेवर नियंत्रण मिळवता येते. तसेच त्याला कमांड देऊन सुरक्षित ठिकाणी उतरवणेही शक्‍य होते. अशा परिस्थितीत ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तीचे त्यावर कोणतेही नियंत्रण राहत नाही. ड्रोनच्या साह्याने घातपाती कारवाया, संशयास्पद चित्रीकरण आदी रोखण्यात आता पोलिसांना यश येणार आहे. सिंगापूर येथील कंपनीकडून ही यंत्रणा घेण्यात आली असून मुंबई पोलिस दलातील निवडक अधिकाऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात कंपनीचे काही कर्मचारीही मदतीसाठी उपलब्ध होते. महिन्याभरापूर्वीच आलेल्या या यंत्रणेची अनेक प्रात्यक्षिके झाली. मुंबई पोलिस आयुक्त कार्यालय आणि त्यानंतर चौपाट्यांवर त्याची रंगीत तालीम झाली. "व्हीआयपी' आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही यंत्रणा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याशिवाय, नव्याने मुंबई पोलिस दलात दाखल झालेल्या सहा ड्रोनच्या साह्याने जुहू, गिरगाव, पवई व आशीष तलाव येथे मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. 

निवडणुकीसाठी सज्ज 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पोलिसांनी वर्षभरापासूनच कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे या वर्षी पहिल्या आठ महिन्यांतच मुंबई पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईने उच्चांक गाठला. यंदा तडीपार करण्यात आलेल्या गावगुंडांचा आकडा 314 वर पोहोचला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai police Anti-drone system