
Crime News : 2400 किलो ड्रग्स प्रकरण; आरोपीची कोट्यवधीची मालमत्ता जप्त...
मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलच्या वरळी युनिटने गेल्या वर्षी 2022 सालच्या 2400 किलो एमडी ड्रग्ज जप्तीच्या प्रकरणात मुख्य आरोपी प्रेम प्रकाश सिंहची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे.
मुंबईतील दहिसर,नालासोपारा आणि गुजरातमधील 2.56 कोटींच्या मालमत्तांची पोलिसांनी जप्ती केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये दहिसरमधील दोन कार्यालये, गुजरातमधील 5 हजार चौरस फुटांचा भूखंड आणि नालासोपारा येथील एका गाळ्याचा समावेश आहे.गेल्या वर्षी मार्चमध्ये या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली होती.
ड्रग्सच्या पैशातून मालमत्ता
मुंबई क्राईम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने 2022 च्या मोठ्या अमली पदार्थांच्या रॅकेटचा भंडाफोड केला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलिसांना असे आढळून आले की या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रेमप्रकाश सिंग याने अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात कमावललेल्या नफ्यातून मालमत्तांची खरेदी केली आहे.
या प्रकरणात जप्ती कारवाई काही महिन्यांनंतर करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी प्रथम मेफेड्रोनच्या निर्मिती आणि पुरवठा प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींची मालमत्ता जप्त केली होती.
प्रकरण थोडक्यात
अंमली पदार्थ विरोधी सेलने सुरुवातीला 29 मार्च 2022 रोजी पूर्व मुंबईतील शिवाजीनगर भागात एका कथित अमली पदार्थ तस्कराकडून 250 ग्रॅम एमडी जप्त केले होते. अमली पदार्थाच्या पुरवठादाराबद्दल त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर, टीमने आणखी एका आरोपीला पकडले. दुसऱ्या आरोपीच्या घरातून 2 किलोपेक्षा जास्त वजनाचा मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते.
या प्रकरणाच्या पुढील तपासानंतर, एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आणि पोलिसांनी 2,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 2,400 किलो वजनाचे एमडी जप्त केले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान मुख्य आरोपी प्रेमप्रकाश सिंग यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले