मुंबई पोलिस लवकरच दिमाखदार बुलेटवर!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई - "सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय' असे ब्रीदवाक्‍य असलेल्या मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 28 हायस्पीड "बुलेट' दाखल झाल्या आहेत. कित्येक वर्षांनंतर मुंबई पोलिस गस्तीकरता बुलेट वापरणार आहेत. उर्वरित 208 बुलेट पुढील वर्षात पोलिसांच्या ताफ्यात येतील. बुलेटप्रमाणेच बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांकरता फिरते कॅन्टीनही असेल.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षेकरता दरवर्षी राज्य सरकार तरतूद करते. पोलिस दलाकरता गृह विभाग नवनवीन तरतुदी करते. शहरातील गल्लीबोळांतही फिरता यावे यासाठी मोटरसायकली दिल्या जातात. परदेशातील पोलिसांकडे गस्तीकरता वेगवान बुलेट आहेत. याच धर्तीवर मुंबई पोलिसांनाही बुलेट देण्याचे ठरले आहे. 2015 मध्ये 236 बुलेट खरेदीबाबतचा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता. या खरेदीकरता सरकारने कोट्यवधींचा निधीही मंजूर केला आहे. त्यातून प्रत्येक पोलिस ठाण्याला दोन बुलेट देण्यात येतील.

मुंबई पोलिसांच्या नागपाडा मोटर परिवहन विभागाने (एमटी) बुलेटना आकर्षक रूप दिले आहे. अतुल पाटील, अतिरिक्त आयुक्त (एमटी) यांच्या संकल्पनेतून त्या तयार करण्यात आल्या आहेत. बुलेटच्या पुढील बाजूला छोटा स्पीकर असेल. सायरनचा आवाज कमी-जास्त करता येईल. मागील बाजूस एक छोटी पेटी आहे. त्यात प्रथमोपचाराचे साहित्य आणि कागदपत्रे ठेवता येतील. मागील बाजूस एलईडी लाईट आहेत.

बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांसाठी फिरते कॅन्टीनही ठेवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्या वेळी हा विषय निघाला होता. पुढील वर्षात ही सोय होईल.

Web Title: mumbai police on bullet