सहा हजार सायबर बॉम्ब निकामी 

सहा हजार सायबर बॉम्ब निकामी 

सहा हजार सायबर बॉम्ब निकामी 
समाजात दुही पसरवणाऱ्यांचे मनसुबे पोलिसांनी उधळले 
अनिश पाटील ः सकाळ वृत्तसेवा 
मुंबई : जम्मू-काश्‍मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर सर्वत्र सतर्कतेचे आदेश असतानाच बकरी ईदच्या दिवशी हिंगोली जिल्ह्यात दोन गटांत दगडफेक झाली. ही घटना काश्‍मीरमधील असल्याचे दर्शवत व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल करण्यात आला. त्यानंतर पसरलेल्या अफवेचे पडसाद नजीकच्या औंढा नागनाथ येथेही उमटले. समाजमाध्यमांवर अफवांच्या माध्यमातून हिंसाचाराला खतपाणी घालण्याची ही पहिली घटना नाही. समाजात दुही निर्माण करण्यासाठी असे "सायबर बॉम्ब' पेरणाऱ्यांनी समाजमाध्यांवर हजारो पोस्ट व्हायरल केल्या होत्या; मात्र मुंबई पोलिसांनी या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्यापैकी सहा हजार पोस्ट ब्लॉक करत संबंधितांचे मनसुबे उधळून लावले. 


समाजात दुही पसरवत निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा गैरफायदा उठवण्यासाठी अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल केल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्य मात्र नाहक होरपळले जातात. मुंबईकरांना यापूर्वी 2012 मध्ये त्याची झळ पोचली होती. त्या वेळी आसाममध्ये बोडो आदिवासी आणि स्थलांतरित मुस्लिमांमध्ये संघर्ष पेटला होता. त्यानंतर 10-12 दिवसांत तेथील हिंसाचाराचा वणवा दक्षिणेकडील राज्यांतही पसरला. मुंबईतही मोठी दंगल उसळली होती. पाकिस्तानमधील संकेतस्थळांवरून, समाजमाध्यमांवरून, मोबाईल संदेशांतून ईशान्य भारतीयांविरोधात तेव्हा गरळ ओकली जात होती. त्यांच्या मनात भय निर्माण होईल असा मजकूर व्हायरल करण्यात येत होता.

ही बाब सरकारच्या लक्षात येईपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. त्यानंतर सुमारे अडीचशे संशयित संकेतस्थळे बंद करण्यात आली. तसेच एका दिवशी पाचहून अधिक एसएमएस पाठवण्यावर 15 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली. 


मॉब लिंचिंगच्या घटनांच्या वेळीही चोरांची टोळी फिरत असल्याचे संदेश, महापुरुषांची विटंबना करणाऱ्या पोस्टही व्हायरल करण्यात आल्या. अशा प्रकारे व्हायरल होणाऱ्या घटनांवर आता पोलिस करडी नजर ठेवून आहेत. 


दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा व्हिडीओ मुंबई पोलिस आयुक्तांचा असल्याचे सांगत व्हायरल करण्यात आला होता. अनेकांनी तो पुढे शेअरही केला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अनेक संकेतस्थळांनी ती "फेक न्यूज' असल्याचे जाहीर केल्यानंतर प्रकरण शांत झाले. 
माहिती-तंत्रज्ञानाच्या, समाजमाध्यमांच्या, जल्पक म्हणजेच ट्रोल्स आणि बॉट्‌सच्या काळात हे हत्यार अधिकच धारदार बनलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर रस्त्यावरील कायदा व सुरक्षा व्यवस्थेप्रमाणे समाजमाध्यमांतून बिघडवण्यात येणाऱ्या परिस्थितीवरही पोलिस यंत्रणांना लक्ष ठेवावे लागत आहे. त्यामुळे पोलिसांनी इंटरनेटवरील "गस्त'ही वाढवली आहे.

गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी अशा आक्षेपार्ह असलेल्या 4800 पोस्ट आणि व्हिडीओ ब्लॉक केले. या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा आकडा सहा हजारांच्या पार गेला. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबच्या माध्यमातून इंटरनेटवरील हे घातक बॉम्ब वेळीच निकामी करण्यात आल्याने अनर्थ टळला. त्यासाठी मुंबई पोलिसांतील तंत्रस्नेही अधिकारी व कर्मचाऱ्यांची फळी काम करते. फेसबुक, ट्विटर, टिक टॉक, यू-ट्युब आदी समाजमाध्यमांवर ते लक्ष ठेवतात. संशयास्पद पोस्टस्‌ तात्काळ हटवण्यात येतात. ब्लू व्हेल गेमच्या पार्श्‍वभूमीवर दोन तरुणांनी समाज माध्यमांवर आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचा मजकूर अपलोड केला होता. त्या वेळी पोलिसांच्या सोशल लॅबने दिल्ली व मुंबईतील या दोन मुलांचे जीव वाचवले होते. 
.... 

तुम्हीही अशा घटना रोखू शकता... 
आपण समाजमाध्यमांचा जबाबदारीने वापर करत विद्वेष निर्माण करणारे संदेश पसरवणे थांबवू शकतो. मोबाईलवर येणारा कोणताही मजकूर, छायाचित्र, चित्रफीत मग ती कोणीही पाठवलेली असो, तिच्यावर विश्‍वास ठेवण्यापूर्वी तसेच फॉरवर्ड करण्यापूर्वी तिची शहानिशा करणे गरजेचे आहे. सामान्य नागरिकांनी असा खारीचा वाटा उचलला तरी अनुचित घटना आपण रोखू शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com