त्यांनी एवढ्या गाड्या चोरल्यात, की मोजणं सोडून दिलंय!

Mumbai police nabs two vehicle thieves
Mumbai police nabs two vehicle thieves

मुंबई : इतक्या गाड्या चोरल्या आहेत की मोजणं कधीच सोडून दिलंय. बाकीच्या गाड्या कुठे आहेत, ते आठवत नाही, असे छातीठोकपणे चौकशीत सांगणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना नुकतीच शिवडी पोलिसांनी अटक केली.  मुंबई व परिसरातून चोरलेल्या 26 दुचाकी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

मेहराज अब्दुलबारी शेख (19) व मुस्ताक लालबाबू मन्सुरी (20) अशी या दोघांची नावे आहेत. मागील चार वर्षांपासून हे दोघे दुचाकी चोरत असल्याची कबूली त्यांनी दिली आहे.

मुंबईतल्या दुचाकी चोरांची सध्या अॅक्टिव्हा गाडी चोरण्याला मोठी पसंती आहे. ही गाडी चोरण्यासाठी सोपी असल्यामुळे आणि या गाड्यांना मोठी मागणी असल्यामुळे चोरी करत असल्याचे आरोपींच्या चौकशीतून पुढे आले आहे. 

मेहराज आणि मुस्ताक हे दोघेही मानखुर्द परिसरात राहणारे असून अल्पवयीन असल्यापासूनच त्यांनी दुचाकी चोरण्यास सुरूवात केली. प्रत्येक गाडी मागे त्यांचे दहा हजार रुपये सुटायचे. गर्दीतल्या दुचाकी अगदी तिसऱ्या मिनिटाला दोघेही चोरायचे. चोरीची गाडी पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून ती गाडी पालिकेच्या पे-पार्कमध्ये नेऊन उभे करायचे. या चौघांच्या चौकशीतून पोलिसांनी आतापर्यंत 26 चोरीच्या गाड्या हस्तगत केल्या आहेत. विशेष या दोघांनी चोरलेल्या अनेक गाड्या त्यांनी कुठे उभ्या केल्या आहेत, याचीही त्यांना माहिती नाही.

दरम्यान नुकतीच या दोघांनी यलोगेट परिसरात एक अॅक्टीवा चोरली होती. या गुन्ह्याचा तपास शिवडी पोलिसांनी करण्यास सुरूवात केल्यानंतर सीसीटिव्हीच्या मदतीने या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

चौकशीत त्यांनी आतापर्यंत मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे परिसरातून अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरलेली दुचाकी गॅरेज किंवा बनावट कागदपत्र बनवणाऱ्यांना देऊन मोबदला म्हणून दहा हजार रुपये घेतल्याचे पोलिसांना सांगितले. 

या दोघांनी अन्य काही ठिकाणी दुचाकी चोरून विकल्या असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे चोरलेल्या दुचाकींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शिवडी पोलिस ठाणे अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com