भाजपच्या कार्यक्रमात शिवसेना खासदाराची अचानक एन्ट्री; कल्याण-डोंबिवलीत राजकीय चर्चांना उधाण

शर्मिला वाळुंज
Tuesday, 26 January 2021

कल्याण - डोंबिवली महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय वातावरण रंगू लागले आहे. 

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत विविध विकासकामांसोबतच नामकरण सोहळे चांगलेच रंगत आहेत. पत्रीपूलाचे अनावरण सोमवारी झाल्यानंतर भाजपच्यावतीने पत्रीपूल व पोहोच रस्त्याला जोडणाऱ्या चौकाचे नामांतरण मंगळवारी करण्यात आले. भाजपच्या या कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कोणतेही निमंत्रण नसताना ते तेथे हजर झाल्याने भाजपचे कार्यकर्ते संभ्रमात पडले. आपल्यातील ऋुणानूबंध आजही कायम असून सध्या सामाजिक अंतर पाळले जात आपण एकमेकांमधील अंतर वाढू नाही दिले पाहीजे असे वक्तव्य यावेळी खासदार शिंदे यांनी केले. मनाने आपण जोडलेले असून ते जपण्याचे सर्वांनी काम केले पाहीजे असेही ते यावेळी म्हणाले. महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय वातावरण रंगू लागले आहे. अशातच शिवसेना भाजपमधील संबंध ताणले जाणार नाहीत याकडे आपण लक्ष दिले पाहीजे असे अप्रत्यक्ष संकेत सेनेच्या खासदारांनी भाजपला दिल्याने कल्याण डोंबिवलीतील सेना भाजपती युती अजूनही अभेद्य आहे का याविषयीच्या चर्चा इतर राजकीय पक्षांच्या वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

कल्याण डोंबिवलीला जोडणाऱ्या पत्रीपूलाचे सोमवारी उद्घाटन झाले. पूलाचे श्रेय लाटण्यावरुन ते पूलाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुन भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले होते. शिवसेनेने या कामाचे श्रेय लाटल्यानंतर भाजपच्या नगरसेविका रेखा चौधरी यांनी पत्रीपूल आणि पोहोच रस्त्याला जोडणाऱ्या चौकाचे नामकरण सोहळा मंगळवारी आयोजित केला. डोंबिवलीचे भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले. या कार्यक्रमादरम्या याच रस्त्यावरुन खासदार शिंदे हे कल्याण दिशेकडे जात होते. कार्यक्रम सुरु असल्याचे पाहून ते तेथे थांबले व कार्यक्रमात सहभागी झाले. शिवसेनेचे खासदार कार्यक्रमाला अचानक आल्याने उपस्थितांच्या भूवया उंचावल्या. खासदारांनी लगेच आपली बाजू सावरत चौधरी यांनी निमंत्रण दिले नसताना मी येथे आलो. या ठिकाणाहून जात असताना आमदार चव्हाण व चौधरी दिसल्याने गाडी न थांबविता निघून जाणे ठिक वाटणार नाही. तसेच आमचे आजही ऋणानूबंध असून ते आमचे चांगले मित्र आहेत असे सांगितले. यानंतर सध्या कितीही सामाजित अंतर राखले जात असले तरी आपल्या मनांतील अंतर वाढू देऊ नका असे सांगण्यास ते विसरले नाहीत. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. 

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातील बातम्या वाचा एका क्लिकवर

कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गेली अनेकवर्षे शिवसेना भाजपची सत्ता आहे. 2015 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपने वेगवेगळी निवडणुक लढविण्याचा निर्णय घेत प्रचारा दरम्यान एकमेकांवर टिकेची झोड उठविली होती. मात्र निकालानंतर कोणालाही एकहाती वर्चस्व मिळत नसल्याने दिलजमाई करीत युतीचा झेंडा पालिकेवर फडकविला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पालिकेतील युतीची सत्ता संपुष्टात येऊन आता भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी कल्याण डोंबिवलीत कॉंग्रेस राष्ट्रवादीची फारशी ताकद नसल्याने एकहाती सत्ता खेचून आणने शिवसेनेला जड जाईल, तसेच हिंदू्त्ववादी मतांचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण येथील रस्त्यांच्या दुरावस्थेवरुन सत्ताधारी सेनेला लक्ष केले होते. राजकीय पक्ष एकमेकांवर टिकेची झोड घेत असतानाच शिवसेनेचे खासदार शिंदे यांनी सेना व भाजपमधील ऋणानूबंध आजही टिकून आहेत असे वक्तव्य केल्याने यांची युती पुन्हा होऊ शकते का? याविषयीच्या चर्चांना इतर राजकीय पक्षांच्या वर्तुळात उधाण आले आहे..

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai political news MP Shrikant Shinde suddenly arrived at the BJP program in kalyan dombivali 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai political news MP Shrikant Shinde suddenly arrived at the BJP program in kalyan dombivali