संथ वाऱ्यांमुळे मुंबईत प्रदूषित धुके 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

मुंबई - थंडीने पळ काढताच मुंबईत मंगळवारी प्रदूषित धुके दिसू लागले. त्याने सकाळपासूनच दक्षिण मुंबई व्यापून टाकली. उपनगरांतही द्रुतगती महामार्गावर हे धुके पसरले होते. आणखी काही दिवस ते मुंबईत दिसेल, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे संचालक व्ही. के. राजीव यांनी सांगितले. त्यामुळे मुंबई काही दिवस प्रदूषणाच्या दहशतीखाली असेल, हे उघड झाले आहे. 

आठवड्याच्या सुरवातीपासून सकाळनंतर थंडीऐवजी पुन्हा उकाडा जाणवू लागला होता. ही परिस्थिती दोन दिवस कायम राहिल्याने मुंबईतील थंडी गेली कुठे, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, हवेची दिशा बदलत आग्नेय दिशेकडून वारे वाहू लागल्याने उकाडा वाढू लागल्याचे राजीव यांनी सांगितले. वाऱ्यांची दिशा पूर्ववत होण्यास थोडा अवधी लागेल. तोपर्यंत कमाल आणि किमान तापमान कमी होणे शक्‍य नसल्याचे राजीव यांनी सांगितले. आर्द्रतेतही वाढ होत ती 81 टक्‍क्‍यांवर गेली आहे. 

प्रदूषित धुक्‍याने मुंबईला वेढताच भांडूप, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर, नवी मुंबई या ठिकाणी अतिदक्षतेचा देण्यात आला. मुंबई प्रादेशिक हवामान खाते; तसेच पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल सायन्सच्या (आयआयटीएम) वतीने मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्रदूषणाची पातळी मोजली जाते. मुंबईतील तापमानवाढीमुळे काही दिवस थंडी नसेल. वारे संथगतीने वाहत असल्याने प्रदूषण वाढलेले दिसेल. चेंबूर येथे सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. भांडूप, अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल आणि नवी मुंबईतही सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. 

Web Title: Mumbai polluted fog slow wind