मुंबईत येताय.... जरा जपून

मुंबईत येताय.... जरा जपून

देशात राहण्यायोग्य दुसऱ्या क्रमांकावरील नवी मुंबई आणि तिसऱ्या क्रमांकावरील मुंबईचे सर्वांनाच आकर्षण वाटते आहे. आंतरराष्ट्रीय शहर आणि वेगवान शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची तुम्हाला ओढ लागली असेल, तर आता या चंदेरी शहरात येताना थोडा विचार करूनच येण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईकडे जाणारे सर्वच प्रमुख रस्ते सध्या डोकेदुखी वाढवणारे ठरत आहेत. छोटे-मोठे वाहन घेऊन या मार्गांवरून प्रवास करण्याचा बेत आखत असाल तर तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवावी लागेल. त्याला कारणही तसेच आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याने त्यातून मार्ग काढताना चार-पाच तास रखडपट्टी होत आहे.

या खड्ड्यांमुळे पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखीसारखे आजार उद्‌भवण्याची भीती आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेद्वारे प्रवास करणाऱ्यांपैकी मधुमेह किंवा मूतखड्याचा आजार असणाऱ्यांची तर या मार्गावर खैरच नाही. तशी कल्पनाही न केलेली बरी. तासन्‌तास एकाच जागी खोळंबलेल्या वाहनांमध्ये बसलेल्या प्रवाशांना ही एखाद्या गंभीर गुन्ह्याची शिक्षाच नव्हे ना, असा प्रश्‍न पडतो. मुंबईकडे जाणारा सायन-पनवेल महामार्ग, पूर्वद्रुतगती मार्ग असो किंवा पश्‍चिम द्रुतगती मार्ग असो, सर्वच प्रमुख मार्ग खड्ड्यांत गेले आहेत.

खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले
अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी (ता. २०) सकाळपासून पुन्हा बरसण्यास सुरुवात केली. त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर बुजवलेल्या खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे वाहतूक धीमी होत असून वाहनांच्या रांगा लागत आहेत. एरव्ही, सायन-पनवेल महामार्गाने मानखुर्दला पोहचण्यासाठी अवघा पाऊण तास लागायचा. मात्र, आता खड्ड्यांमुळे तीन-चार तास कोंडीत अडकावे लागते. या मार्गावरील कळंबोली, कोपरा, खारघर, सीबीडी-बेलापूर, उरण फाटा उड्डाणपूल, नेरूळ, शिरवणे भुयारी मार्ग, सानपाडा उड्डाणपूल, वाशी सिग्नल आणि वाशी टोलनाका येथील खड्ड्यांमुळे वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत. ठाण्याकडूनही मुंबईत येताना पूर्वद्रुतगती मार्गावर कामराजनगर जंक्‍शन घाटकोपर, कुर्ला सिग्नल, सुमननगर जंक्‍शन आणि सायन या तीन ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रत्येक ठिकाणी वाहनांची रांग पुढे सरकण्यास १५ ते २० मिनिटे लागत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com