
Mumbai News : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीच्या कारवाईत घट
मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक नियम मोडण्याच्या घटना कमी झाल्याचे महामार्ग पोलिसांच्या आकडेवारी पुढे आले आहे. परिणामी गेल्यावर्षी जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात वाहतूकदारांवर केलेल्या कारवाईच्या तुलनेत यावर्षीच्या दोन महिन्यांच्या कारवाईची संख्या घटली आहे.
पळस्पे , बोरघाट, खंडाळा, वडगाव या परिसरातील कारवाई घटल्या असून, यावर्षी दोन महिन्यात ८२ हजार ६५६ केसेस दाखल केल्या असून, त्यातून १५ कोटी ३ लाख ६० हजारांची रग्गड कमाई झाली आहे.
दोन मोठ्या शहरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहनांची कोंडी होते. प्रत्येक दिवशी द्रुतगती महामार्गावर धावणारे वाहन नविन असतात. त्यामूळे या महामार्गावरील नियमांचे काटेकोर पालन होत नाही.
नविन चालकांना नियम माहिती नसल्याने दररोज वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा निष्कर्ष नुकताच परिवहन विभागाने काढला होता. त्यामूळे रोज येणाऱ्या नविन वाहन चालकांना नियमानुसार वाहतुक करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आव्हाण असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतरही यावर्षी काहीप्रमाणात वाहतुक नियम मोडण्याच्या घटना घटल्या असल्याचे महामार्ग पोलीसांच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे.
जानेवारी, फेब्रुवारी २०२२ मध्ये एकूण ८७ हजार ५१९ केसेस महामार्ग पोलीसांनी वाहतुकदारांवर दाखल केल्या होत्या, त्यानुसार तब्बल १६ कोटी २५ लाख ५७ हजार ९०० दंड वसुली करण्यात आली होती. तर यावर्षी ८२ हजार ६५६ केसेस दाखल केल्या असून, १५ कोटी ३ लाख ६० हजारांची दंड वसूली करण्यात आली असल्याचे महामार्ग पोलीस विभागाने सांगितले आहे.