मुंबई - पुणे महामार्गावर अवैध वाहतूकीचा विळखा !

ब्रह्मा चट्टे
रविवार, 22 जुलै 2018

याबाबत आमच्याकडे कोणीही तक्रार केली नाही. मुंबई - पुणे मार्गावर ओला उबेर, टुरिस्ट वाहने प्रवाशी वाहतूक करतात. मात्र, खासगी अवैध प्रवाशी वाहतूक सुरू असेल तर त्यावर कडक कार्यवाही केली जाईल. 
- शेखर चन्ने, परिवहन आयुक्त 

मुंबई : मुंबई - पुणे महामार्गावर सर्रास अवैध वाहतूक सुरू आहे. याकडे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी "अर्थपुर्ण" दुर्लक्ष केल्याने या वाहतुकदारांना रान मोकळे मिळाले आहे. महिना दहा ते बारा कोटीची उलाढाल होणाऱ्या अवैध धंद्यावर कोणाचेच अंकूश नसल्याचे चित्र आहे. 

मुंबईहून पुण्याकडे जाण्याच्या मार्गावर दादर, चेंबूरनाका, वाशी, सानपाडा, खारघर, बेलापूर, कंळबोली सर्कल या ठिकाणी खासगी वाहने प्रवाशी घेतात. तर पुण्याहून मुंबईकडे येताना कात्रज, चांदणी चौक, वाकड व पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजी नगर आदी ठिकाणाहून प्रवाशी घेतात. या मार्गावर प्रवाश्यांकडून मुंबई - पुणे व पुणे - मुंबई असा प्रवास करण्यासाठी 250 रू ते 350 रूपयांपर्यंत तिकीट आकारले जाते. मुंबईहून पुण्याकडे जाताना तळेगाव टोलनाक्यावर या गाड्या रूट प्रमाणे प्रवाशी आदलाबदल करतात. बोलेरो, क्वालिस, स्कार्पिओ, मारूती ओमणी, वँगनार यासारख्या माँडेलच्या गाड्यांमध्ये 6 ते 10 पर्यंत प्रवाशी भरले जातात. विशेष म्हणजे परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असतो. मात्र, याकडे परिवहन विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करतात. उदाहरणादाखल ज्या गाड्या रोज या मार्गावर चालत नाहीत. अशा व योग्य तो मोबदला न देणाऱ्या गाड्यांवर कार्यवाहीचा बडगा उगारला जात असल्याची माहिती एका ड्राव्हरने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. प्रवाशी वाहतुकीचा परवाना नसतानाही या गाड्या कोणाच्या मेहरबानीने बिनदास्त प्रवाशी वाहतूक करतात असा प्रश्न विचारला जात आहे. 

अवैध खासगी प्रवाशी वाहतूक फोफावल्यामुळे या मार्गावर प्रवाश्यांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. काही दिवसापुर्वीच अशाच पध्दतीच्या गाडीमध्ये प्रवास करताना एका वाहिनीच्या अँकरला लुटण्यात आले आहे. जलद प्रवास होत असल्याने या मार्गावर प्रवाशी अशा अवैध गाड्यांनी प्रवास करत असल्याचे दिसते. मात्र यामुळे प्रवाशांना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे सांगता येणार नाही. 

- दररोज तब्बल 1000 खासगी गाड्यातून अवैध प्रवाशी वाहतूक 
- एका वाहनातून सरासरी 8 प्रवाश्यांची वाहतूक 
- एका दिवसात दुहेरी वाहतूकीत तब्बल 15 हजार प्रवाश्यांची वाहतूक
- महिना एक गाडी ठिक ठिकाणी मिळून 8000 रू हप्ता देते. 
- महिना 80 ते 85 लाखाचा मलिदा परिवहन विभागाकडे जात असल्याची सुत्रांची माहिती.

याबाबत आमच्याकडे कोणीही तक्रार केली नाही. मुंबई - पुणे मार्गावर ओला उबेर, टुरिस्ट वाहने प्रवाशी वाहतूक करतात. मात्र, खासगी अवैध प्रवाशी वाहतूक सुरू असेल तर त्यावर कडक कार्यवाही केली जाईल. 
- शेखर चन्ने, परिवहन आयुक्त 

परिवहन विभाग याविरोधात कार्यवाही करत नाही, कारण त्यांना त्यातून भ्रष्टाचार करता येतो. अशा पध्दतीने गोळा होणारा पैसा हा परिवहन विभागाच्या कर्मचारी ते आयुक्त व परिवहन मंत्र्यांपर्यंत वाटून घेतला जातो. त्यामुळे ते अशा अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष करतात.
- अध्यक्ष, मराठी कामगार सेना

Web Title: mumbai pune expressway transport issue