मुंबई-पुणे रेल्वेने प्रवास करू नका; कारण...

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेसाठी आणखी वाट पाहावी लागणार असून, कोसळलेल्या दरडींचा ढिगारा आणि रुळ दुरुस्तीचे काम अद्याप सुरु आहे. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक गुरुवारी पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेसाठी आणखी वाट पाहावी लागणार असून, कोसळलेल्या दरडींचा ढिगारा आणि रुळ दुरुस्तीचे काम अद्याप सुरु आहे. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक गुरुवारी पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

मंकी हिल घाटात कोसळलेल्या दरडी हटवण्याचे काम मंगळवारी देखील सुरु होते. क्रेनच्या मदतीने मातीचा ढिगारा हटवण्यासाठी काम सुरु असताना मंगळवारी पुन्हा दरड आणि मातीचा काही भाग कोसळल्यामुळे मदतकार्यातील क्रेन अडकली होती. दरम्यान अन्य क्रेनच्या मदतीने ही क्रेन चिखलातून बाहेर काढण्यात आली आहे. बुधवारी देखील दरड हटवण्याचे काम सुरु राहणार असून, मुंबई-पुणे घाट मार्गावरील रेल्वे वाहतूक गुरुवारी पूर्ववत करण्याचे प्रयत्न असणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये मंगळवारी मध्य रेल्वेवरील शेलू-नेरळ, वागंणी आणि टिटवाळा स्थानकाजवळ ताशी 20 किमीप्रतितास अशी वेगमर्यादा कार्यान्वित करण्यात आली होती. या वेगमर्यादेमुळे लोकल फेऱ्या विलंबाने धावत होत्या.

दरम्यान, मुसळधार पाऊस, दरड कोसळणे आणि रुळ वाहून गेल्याने सुमारे 100 पेक्षा अधिक मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून, यांमुळे मध्य रेल्वेला 20 कोटींचा फटका सहन करावा लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Pune railway Stopped