प्रवाशांशी देणे-घेणे आहे की नाही?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

मुंबईकर रेल्वेच्या फसलेल्या नियोजनाच्या गर्दीचे बळी ठरल्याने दिवसभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

मुंबई - मुंबईत मुसळधार पावसाने दाणादाण उडवल्यानंतर नोकरदारांचा दोन दिवस खाडा झाला. बुधवारी पावसाने उघडीप घेतल्याने काहीसा निर्धास्त असलेले मुंबईकर रेल्वेच्या फसलेल्या नियोजनाच्या गर्दीचे बळी ठरल्याने दिवसभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. रविवारचे वेळापत्रक लागू करायचे होते तर रेल्वेने गर्दीची वेळ टाळून दुपारी ते अमलात आणायचे. रेल्वेला आमच्याशी काही देणे-घेणे आहे की नाही? अशी टीकाही प्रवाशांनी केली. 

पश्‍चिम रेल्वे सुरळीत सुरू असताना मध्य रेल्वेला आज अचानक काय खूळ सुचले, अशी चर्चा आज जवळजवळ सर्वच स्थानकांवरील प्रवाशांमध्ये होती. तिसऱ्या दिवशीही कार्यालयात लेटमार्क लागल्याने नोकरदार चांगलेच वैतागले होते. स्थानकावर आल्यावर अर्धा तास गाडी नाही, उद्‌घोषणेचाही पत्ता नाही, प्रचंड गर्दीमुळे आलेल्या गाडीत पाय ठेवायला जागा नाही, अशी स्थिती मध्य रेल्वेच्या जवळपास सर्वच स्थानकांमध्ये होती. बेस्ट-टॅक्‍सीने जावे तर रस्तेही तुडुंब भरलेले, अशा कात्रीत प्रवासी सापडले होते. कामाचे दोन दिवस बुडल्याने आज मोठ्या संख्येने रिक्षा-टॅक्‍सींसह खासगी गाड्याही रस्त्यावर आल्या होत्या. त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे नोकरदारांच्या त्रासात मोठीच भर पडली. गाडीच्या गर्दीत धडपडण्यापेक्षा काहीजण तासभर वाट पाहून उलटपावली घरी गेले. काही जण शांतपणे तासभर रेल्वेस्थानकावरच बसून होते. गोंधळाबाबत प्रवाशांनी ‘सकाळ’कडे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.  

पावसात रेल्वे खोळंबू शकते, असा विचार करूनच रेल्वे प्रशासनाने नियोजन करायला हवे. गाड्या कमी करून प्रवाशांची गर्दी कमी होणार नाही. प्रवाशांना कमी त्रास सहन करावा लागेल, अशी सजगता रेल्वेने दाखवायला हवी.  
- संदीप वाटघरे, अंधेरी

घाटकोपर स्थानकात सकाळी साडेआठ वाजता पोचलो. प्रवाशांच्या गर्दीने स्थानक तुडुंब भरले होते. लोकल अर्धा तास उशिराने येत होत्या. दीड तास रेल्वेस्थानकातील गर्दीत ताटकळत होतो. बेस्टने सीएसएमटीला जाणे सोयीचे नसल्याने काहीच पर्याय नव्हता. 
- राजू साळवे, घाटकोपर 

रविवारचे वेळापत्रक दुपारच्या वेळेत चालवयाचे. नेहमीच रेल्वेचा काहीना काही बिघाड असतो. आज लोकल फेऱ्या कमी केल्यामुळे गर्दीचा त्रास सहन करावा लागला. भांडुप स्थानकात पाऊण तास गर्दीमुळे गाडीत शिरायलाच मिळाले नाही. 
- विशाल विधाते, भांडुप 
सकाळी नऊ वाजता विद्याविहार स्थानकात आलो; पण फलाटावरील गर्दीमुळे लोकलमध्ये चढायलाच मिळाले नाही. मध्य रेल्वेने नियोजन करण्यापूर्वी प्रवाशांचा विचार करायला हवा. दुपारच्या सत्रातील लोकल रद्द केल्या असत्या तर आज आम्ही वेळेत कार्यालयात पोहचलो असतो. 
- श्रीनिवास शिंदे, विद्याविहार

हवामान खात्याच्या अंदाजानुसार रेल्वेने बुधवारी रविवारच्या वेळापत्रकानुसार वाहतूक करण्याचे ठरवणे हास्यास्पदच आहे. पाऊस नसतानाही प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने नाहक त्रास देऊन अंत पाहू नये.
- मयूरेश चव्हाण, ठाणे

मंगळवारी आमची दांडी झाल्याने आम्हाला काही करून कामावर जायचे होते. पावसाचा कालपासून पत्ता नाही. तरीही रेल्वे अद्याप सुरळीत सुरू होऊ शकत नाही. आपली वाहतूक व्यवस्था किती सक्षम आहे, हेच त्यातून दिसून येते.
- विकास पालकर, मुलुंड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Railway passenger crowd