26 जुलैच्या तेराव्या वर्षीही परिस्थिती "जैसे थे' 

26 जुलैच्या तेराव्या वर्षीही परिस्थिती "जैसे थे' 

मुंबई - मुंबईत 26 जुलै 2005 मध्ये आलेल्या महापुराला गुरुवारी 13 वर्षे पूर्ण झाली. अचानक आलेल्या आपत्तीने अवघी मुंबई हादरली होती. महाप्रलय पुन्हा होऊ नये म्हणून पालिकेने "ब्रिमस्टोवॅड' प्रकल्प प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत प्रकल्पावर 3200 कोटी रुपये खर्च केले; परंतु मुसळधार पाऊस सुरू झाला की मुंबईकरांना आजही धडकी भरते. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई जलमय होते. मुंबईकरांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. 

यंदा जुलैच्या पंधरवड्यातच मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढले. रेल्वे रूळ अनेकदा पाण्यात गेले आणि प्रवाशांचे हाल झाले. मुंबई जलमय झाली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आणि वाहतुकीचा बोजवारा उडाला. दरवर्षी मुंबईकरांना पुराच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोट्यवधी खर्च करूनही परिस्थिती "जैसे थे'च असते. "तुंबई'च्या संकटावर मात करण्यासाठी महापालिकेने 1989 मध्ये ब्रिमस्टोवॅड प्रकल्प हाती घेतला होता. मधल्या काळात तो रेंगाळला. 26 जुलैच्या महापुराने मात्र पालिकेला पुन्हा जाग आली. महापुराला मिठी नदी कारण ठरली होती. त्यानंतर ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची पालिकेने नव्याने तयारी सुरू केली. तब्बल तीन हजार 200 कोटी रुपये प्रकल्पावर महापालिकेने खर्च केला आहे. इतके करूनही दादर हिंदमातासह परळ, अंधेरी, मरीन लाईन्स, कालिना, कांजूरमार्ग, सांताक्रूझ आदी सखल भागांत पाणी साचतेच. 

हाजी अली, ईर्ला, लव्हग्रोव्ह, ब्रिटानिया आणि आऊटफॉल पंपिंग स्टेशनची कामे पूर्ण झाली आहेत. आणखी दोन पंपिंग स्टेशनची कामे बाकी आहेत. मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत आहे. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पामुळे मुंबईतील नाल्यांची क्षमता वाढली. ताशी 50 मिलिमीटर इतक्‍या पावसाला वाहून नेण्याची क्षमता सध्या नाल्यांमध्ये आहे. त्यापेक्षा अधिक पाऊस झाल्यास मुंबई तुंबते. पाणी साचण्याच्या संकटावर अजूनही पालिकेला मात करता आलेली असल्याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

26 जुलैच्या महापुराला 13 वर्षे झाली. अजूनही परिस्थितीत सुधारणा नाही. सत्ताधारी शिवसेना, भाजप व पालिका प्रशासन त्याला जबाबदार आहे. 
- रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका 

का बुडते मुंबई? 
- सातत्याने होत असलेल्या भरावामुळे पाण्याचा निचरा होण्यात अडथळा 
- "मायक्रो फ्लड मॉडेलिंग' प्रकल्पाबाबत पालिका उदासीन 
- सखल भागांतील पर्जन्य जलवाहिन्या नव्याने टाकण्याची गरज 
- कचरा अडकल्याने निरुपयोगी ठरणारे पंप 
- नष्ट होत असलेले तलाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com