Red Alert Mumbai: मुंबईत NDRF च्या तुकड्या सज्ज, नागरिकांनी सतर्क राहा 

पूजा विचारे
Tuesday, 4 August 2020

आज अनेक भागात हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विभागीय नियंत्रण कक्ष आणि इतर सर्व नियंत्रण कक्षांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईः मुंबईत वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. कुर्ला, नेहरूनगर, भायखळा, गोरेगाव, किंग सर्कल, करी रोड, कांदिवली, चारकोप परिसरातील सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईसह उपनगरात आज आणि उद्याअतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज अनेक भागात हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

विभागीय नियंत्रण कक्ष आणि इतर सर्व नियंत्रण कक्षांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. सर्व विभागीय नियंत्रण कक्षांना आवश्यक मनुष्यबळ साधनसामुग्रीसह सज्ज ठेवण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत.

पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ पंपिग स्टेशन आणि २९९ पंप ठिकाणी बसविण्यात आलेत. अग्निशमन दलास त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह आणि साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवण्यास सांगण्यात आली आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (NDRF) ३ तुकड्यांना आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना पालिकेकडून देण्यात आल्यात. 

भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिकाऱ्यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला आहे. त्यामुळे मदतीकरिता तत्पर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आणि कार्यतत्पर आहे. बेस्‍ट (बीईएसटी) (वाहतूक आणि विद्युत) आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन हाय अलर्ट वर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांची मदत पथके तत्पर ठेवण्यास सांगण्यात आलंय. 

शिक्षण अधिकारी यांना महापालिकेच्या 24 विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून निश्चित करण्यात आलेल्या महापालिका शाळा त्वरि‍त मदतीकरिता उघडून ठेवण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाद्वारे देण्‍यात आलेत. 

मिठी नदीची पातळी वाढली तर स्थलांतर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 24 वॉर्डमध्ये तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येत असून गरज पडल्यास शाळा उघडून ठेवण्याचे आदेशही देण्यात आल्याचं समजतंय.

Mumbai rain live updates ndrf team heavy rains continue


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai rain live updates ndrf team heavy rains continue