मुंबईची गाडी मार्गावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

मॅनहोलची झाकणे वाहून गेली
काल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले बहुसंख्य रस्ते आज मोकळे करण्यात आले. किंग्ज सर्कलमधील गांधी मार्केटजवळील रस्त्यावरील मॅनहोलचे झाकण तुटल्याने आज तो रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. महापालिकेने अनेक मॅनहोलवर नव्या प्रकारची हलकी झाकणे लावली आहेत. ती पटकन तुटत असल्याच्या तक्रारी आहेत. अतिवृष्टीच्या काळात गटारांमधून पाणी वेगाने वर रस्त्यावर येऊन वाहू लागते. त्या वेळी हलकी झाकणे वाहून जातात, असेही दिसून आले आहे. अशा अनेक ठिकाणी हलक्‍या झाकणांवर दगड वा कुंड्या असे वजन ठेवलेले आजही दिसून येत होते.

मुंबई - दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने बुधवारी अवघी मुंबई ठप्प झाल्यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशी सकाळनंतर जनजीवन पूर्वपदावर आले असले तरी कालची दगदग व आजच्या धास्तीमुळे कित्येक मुंबईकरांनी आज सक्तीची ‘रजा’ घेतली. काल पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने रात्री उशिरापर्यंत नोकरदारांचे हालसत्र सुरूच होते. गुरुवारी सकाळपासून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले असले तरी लोकल आणि रस्त्यावर तुरळक गर्दी होती.

काल मध्यरात्रीनंतर मध्य रेल्वेची वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू झाली. पश्‍चिम रेल्वेच्या गाड्या त्यापूर्वीच रात्री सुरू झाल्या. मात्र त्या पंधरा ते वीस मिनिटांनी येत असल्याने प्रवाशांची मोठीच गर्दी उसळली होती. अनेक खासगी व मंत्रालयातील सरकारी कर्मचारी काल रात्री आपापल्या कार्यालयातच राहिले होते. तिथे त्यांची कार्यालयातर्फेच जेवणाचीही सोय झाल्याने त्यांना दिलासा मिळाला.   

रात्री हळूहळू रेल्वे गाड्या सुरू झाल्याचे पाहून शक्‍य होते त्यांनी घरी जाणेच पसंत केले. गर्दीने भरलेल्या गाड्यांमधून मंदगतीने प्रवास करत उशिराने त्यांनी आपले घर गाठले. काल रात्री रिकाम्या जाणाऱ्या अनेक खासगी वाहनचालकांनी रस्त्यावरून चालणाऱ्या प्रवाशांना लिफ्ट देऊन माणुसकीचे दर्शन घडवले. उरलेले कर्मचारी सकाळी गाड्या पकडून आपापल्या घरी निघाले. सकाळी पश्‍चिम व मध्य रेल्वेच्या गाड्या पंधरा ते वीस मिनिटांनी येत होत्या. आठ-नऊ वाजल्यानंतर त्या वेळापत्रकानुसार धावू लागल्या. सकाळी बहुतेक रस्त्यांवरील पाणी ओसरल्याने एसटी, रिक्षा आणि टॅक्‍सी वाहतूकही सुरू झाली. सात वाजल्यानंतर बेस्ट बसही रस्त्यांवर धावू लागल्या.  

वाहतूक सुरू झाली तरी काल दमलेले व धास्तावलेले कर्मचारी सकाळी उशिरापर्यंत घरीच होते. बऱ्याच नागरिकांनी कामाला दांडी मारणेच पसंत केले. शाळा-महाविद्यालयांनाही आज सुटी असल्याने विद्यार्थीही घरीच राहिले. त्यामुळे आज उपनगरी गाड्यांमध्येही फारशी गर्दी नव्हती. काल गणेशोत्सवाचे जे मंडप पाण्यात गेले होते त्यांनी आज सकाळपासून स्वच्छता सुरू करून नेहमीप्रमाणेच गणेशाची साग्रसंगीत पूजा-आरती केली. पावसात बिघडलेली वाहने ‘टो’ करून गॅरेजात नेण्याचीही लगबग सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Rain Stop Railway Bus Start