मोठी दुर्घटना टळली, पश्चिम एक्सप्रेस हायवेजवळ दरड कोसळली

भाग्यश्री भुवड
Tuesday, 4 August 2020

कांदिवली परिसरात भली मोठी दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून तात्पुरती ही वाहतूक फाउंटन येथून वळवण्यात आली आहे.

मुंबईः मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पाऊस सुरुच आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे. कांदिवली परिसरात भली मोठी दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. या पावसाचा फटका मुंबईकरांना बसला असून अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. तर, पश्चिम महामार्गावरील डोंगराचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे, या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून तात्पुरती ही वाहतूक फाउंटन येथून वळवण्यात आली आहे.

मालाड पूर्व टाइम्स बिल्डिंगच्या समोर असणारा डोंगराचा भाग कोसळला आहे. त्यामुळे, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली असून रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. तर कांदिवलीजवळ डोंगराचा भाग कोसळून पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मिरारोडहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

या दुर्घटनेत सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही. दरड कोसळल्यामुळे एका बाजूची वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. महापालिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून दरड हटवण्याचे काम सुरू आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पाऊस सुरुच आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे. 

मुंबईत NDRF च्या तुकड्या सज्ज

मुंबईत वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. कुर्ला, नेहरूनगर, भायखळा, गोरेगाव, किंग सर्कल, करी रोड, कांदिवली, चारकोप परिसरातील सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईसह उपनगरात आज आणि उद्याअतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज अनेक भागात हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

विभागीय नियंत्रण कक्ष आणि इतर सर्व नियंत्रण कक्षांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. सर्व विभागीय नियंत्रण कक्षांना आवश्यक मनुष्यबळ साधनसामुग्रीसह सज्ज ठेवण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत.

संपादनः पूजा विचारे

Mumbai rain updates landslide western express highway near kandivali no casualties


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai rain updates landslide western express highway near kandivali no casualties