Mumbai Rains : मुंबईत पुन्हा संततधार; अनेक भागात साचले पाणी (व्हिडिओ)

rain
rain

मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात रविवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असून, अनेक सखोल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम रेल्वे व रस्ते वाहतुकीवर झाला आहे. आठवड्याच्या सुरवातीलाच नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकावर पाणी साचल्यामुळे त्याचा फटका ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांना बसत आहे. गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.

गेल्या आठ तासात मुंबईत शहर भागात 91.22 मिमी, पूर्व उपनगरात 78.11 आणि पश्चिम उपनगरात 55.59 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दादर, किंग्जसर्कल, कुर्ला या परीसरात पाणी भरण्यास सुरवात झाली आहे. मुंबईत आज (रविवार) सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वे लोकल सेवा विलंबाने सुरु आहे. ऐन गर्दीच्या वेळी प्रवशांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागत आहे. तर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. महापालिका प्रशासनाचे काम सुरु आहे.

मानखुर्द स्थानक मार्गावर पाणी तुंबले  
अणुशक्ती नगर ट्रॉम्बे कडून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी तुंबले आहे. मानखुर्द गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांमध्ये, दुकानात पाणी शिरले आहे. रस्त्याच्या कडेला, पदपथावर दुकानदारांनी अतिक्रमण करत पाण्याची वाट अडवली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. रहिवाशांनी विनंती करून देखील दुकानदारांनी दुकानांसमोरील साहित्य हटवण्यास आडमुठेपणा दाखवत नकार दिला आहे. 

पालघर जिल्ह्यात पावसाचा कहर 
पालघर जिल्ह्यात गेल्या चार दिवस जोराचा पाऊस सुरू आहे. मात्र रात्रीपासून पावसाने जोर पकडला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही झाला. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्तेवाहतुक खोळंबली तर सफाळे, केळवे आणि पालघर रेल्वे स्थानकांत रुळांवर पाणी आल्याने लोकलसेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला. सफाळे आणि मनोर, बोईसर बाजारपेठेत तसेच घरांमध्ये ही पाणी शिरले होते. सध्या पाऊस हलका झाल्याने हळूहळू रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्व पदावर येत आहे मात्र पावसाचा जोर कायम आहे.

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात रात्रभर पाऊस
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून, मात्र अजून तरी शहरांतील सकल भागात पाणी साचलेले नाही. असाच पाऊस सतत सुरु राहिलयास नदी किनाऱ्याच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com