मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

कुलाबा वेधशाळेचे संचालक के. जे. रमेश यांनी आजच्या पावसाची 26 जुलै 2005 च्या पावसाबरोबर तुलना करण्यास नकार दिला. त्या वेळी अभूतपूर्व वृष्टी झाली होती. त्या 26 जुलैला 944 मि.मी. पाऊस झाला होता. मुंबईसाठी 100 ते 150 मि.मी. पाऊस नवीन नाही, असे त्यांनी सांगितले. आम्ही यापूर्वीच महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला अतिवृष्टीचा इशारा दिला होता, असे ते म्हणाले. 

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत बहुतांश ठिकाणी आज वाहतूक कोंडी झाली. दादर हिंदमाता परिसरात पाणी साचल्याने भायखळा उड्डाणपुलापासून परळपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. लोकल बंद पडल्याने खासगी वाहनचालक मुंबईकर चाकरमान्यांना चांगलेच लुबाडताना दिसत होते. एकेका प्रवाशाकडून तीनशे ते चारशे रुपये आकारले जात असल्याचे प्रवासी सांगत होते. वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना रुग्णवाहिकांच्या चालकांनाही बरीच कसरत करावी लागत होती. 

नायर रुग्णालयात पाणीच पाणी
मुंबई सेंट्रल पूर्वच्या मराठा मंदिर परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या ठिकाणी साचलेले पाणी रस्त्यावर येत होते. परिणामी आग्रीपाडा, मराठा मंदिर येथे पाणी साचले होते; तर डॉ. आनंद नायर रोड येथील साचलेल्या पाण्यातून रुग्णांचे नातेवाईक ये-जा करत होते. 

गणेशोत्सव मंडळाची सामाजिक बांधिलकी
मुंबई सेंट्रल स्थानकात अडकलेल्या चाकरमान्यांच्या मदतीला ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे (ताडदेवचा राजा) कार्यकर्ते धावून आले. रेल्वे स्थानकात अडकलेल्यांना चहा-बिस्कीट, न्याहरी दिली जात होती; तर पनवेल-पालघर परिसरातील महिलांची तात्पुरती व्यवस्था मंडपात करण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर यांनी सांगितले. 

वाहनचालकांकडून लुटमार सुरूच 
पावसामुळे लोकल बंद पडल्याने खासगी वाहनचालक चाकरमान्यांना लुबाडत होते. ऑर्थर रोड नाका येथून मानखुर्द, पनवलेला टेम्पोतून जाण्यासाठी 400 रुपये आकारले जात होते. टेम्पोमध्ये महिला आणि पुरुषांना अक्षरशः कोंबून नेले जात होते. वाहनात पाणी जाईल, टॅक्‍सीचा गॅस संपला अशी थातुरमातुर उत्तरे देत टॅक्‍सीचालक प्रवाशांना नाकारत होते; तर काही खासगी वाहनचालक मनमानी करताना दिसत होते. 

ऑर्थर रोड तुरुंग पाणी शिरले
चिंचपोकळीच्या ऑर्थर रोड कारागृहातदेखील पाणी शिरले होते. गुडघाभर पाणी साचल्यामुळे दुपारनंतर कैद्यांना न्यायालयात ने-आण करण्याचे प्रमाण कमी होते. पावसामुळे नेहमी गजबजलेल्या ऑर्थर रोड तुरुंगाजवळ शुकशुकाट होता. तशीच परिस्थिती कस्तुरबा रुग्णालयाजवळही होती; तर ऑर्थर रोड नाका परिसरात अनेक तरुण मदतीसाठी रस्त्यावर उतरले होते. पाण्यातून वाट काढत जाणाऱ्या चाकरमान्यांना मार्ग दाखवण्याचे काम तरुण करत होते; तर लालबाग हिंदमाता परिसरात पाणी साचल्याने अनेक दुकानांत पाणी शिरले होते. 

वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकांना
रेसकोर्स ते महालक्ष्मी उड्डाणपुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पाणी साचल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पावणेचारच्या सुमारास दोन रुग्णवाहिका विरुद्ध दिशेने मार्ग काढून महालक्ष्मीहून वरळीच्या दिशेला गेल्या. भारतमाता येथून हिंदमातापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. पावणेसहाच्या सुमारास एक रुग्णवाहिका सायरन देत परळ रेल्वे कार्यशाळेजवळ आली. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेच्या चालकाने रुग्णवाहिका पलीकडच्या मार्गावरून केईएम रुग्णालयाच्या दिशेला नेली. 

ऑगस्टमधील विक्रम 
सांताक्रूझला सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान 298 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मागील 10 वर्षांत ऑगस्टमध्ये 24 तासांत एवढा पाऊस झाला नव्हता, अशी माहिती "स्कायमेट'ने दिली. पावसाचा जोर 24 तास कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

'अभूतपूर्व नाही' 
कुलाबा वेधशाळेचे संचालक के. जे. रमेश यांनी आजच्या पावसाची 26 जुलै 2005 च्या पावसाबरोबर तुलना करण्यास नकार दिला. त्या वेळी अभूतपूर्व वृष्टी झाली होती. त्या 26 जुलैला 944 मि.मी. पाऊस झाला होता. मुंबईसाठी 100 ते 150 मि.मी. पाऊस नवीन नाही, असे त्यांनी सांगितले. आम्ही यापूर्वीच महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला अतिवृष्टीचा इशारा दिला होता, असे ते म्हणाले. 

डबेवाले कामावर 
मुंबईतील जनजीवन पावसामुळे विस्कळित झाले; मात्र डबेवाल्यांनी नेहमीप्रमाणेच त्यांचे कर्तव्य बजावले, असे सांगण्यात आले. डबेवाल्यांनी साचलेल्या पाण्यातूनही सायकल दामटत डबे पोहोचवण्याचे काम केले.

Web Title: mumbai rains mumbai monsoon mumbai news marathi news mumbai weather