Mumbai Rain Updates: गरज असेल तरच बाहेर पडा!, मुंबईत रात्रभर तुफान पाऊस

पूजा विचारे
Tuesday, 4 August 2020

शहरात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असून, रस्ते वाहतूक मंदावली आहे. उपनगरीय रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम झाला असून, महापालिकेने आज, कार्यालयं बंद ठेवण्याचं आवाहन केलंय.

मुंबई : मुंबई आणि उपनगर परिसराला काल रात्री मुसळधार पावसानं झोडपलं. त्यामुळं मुंबईकरांची आजची सकाळ चिंब चिंब झाली आहे. शहरात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असून, रस्ते वाहतूक मंदावली आहे. उपनगरीय रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम झाला असून, महापालिकेने आज, कार्यालयं बंद ठेवण्याचं आवाहन केलंय. हवामान खात्यानं तीन तारखेपासूनच मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मुंबईत आणखी दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्य़ात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे दादर आणि कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले आहे. मेन लाईन आणि हार्बर लोकल वाहतूक बंद आहे. हवामान अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज मुसळधार पावसाची शक्यता असून समुद्रास दुपारी 12:47 वाजता भरती आहे. मुंबईकरांनी  गरज असेल तरच बाहेर पडा,  समुद्रकिनारे तसंच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावं, असं आवाहन मुंबई महापालिकेनं नागरिकांना केलं आहे.

रेड अलर्ट जारी

मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरुच आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे. 

हिंदमाता, दादर टीटी, शक्कर पंचायत, एसआयईएस महाविद्यालय, गोयल देऊळ, भेंडी बाजार जंक्शन, ठाकुरद्वार नाका, षण्मुखानंद हॉल, शेख मिस्त्री दरगाह मार्ग, पोस्टल कॉलनी इथे पाणी साचलं आहे. तसंच उपनगरातील अंधेरी सब वे, भांडुप पाणी साचल्याची माहिती समोर आली आहे. 

हवामान अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज मुसळधार पावसाची शक्यता असून समुद्रास दुपारी 12:47 वाजता भरती आहे. मुंबईकरांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसंच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावं, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं मुंबईत दमदार हजेरी लावली. सोमवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. 

मुंबईतील पावसाची आकडेवारी (पहाटे सहा वाजेपर्यंत)

मुंबई शहर – 230.06 मिमी

मुंबई पूर्व उपनगर – 162.83 मिमी

मुंबई पश्चिम उपनगर – 162.28 मिमी

Mumbai rains updates Heavy rain flooding office shut red alert


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai rains updates Heavy rain flooding office shut red alert