महापालिका करणार 25 टन प्लास्टिकचा पुनर्वापर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

नवी मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेनुसार आता प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी महापालिकेने पावली उचलली आहेत... 

प्लास्टिक मिळवण्यासाठी स्वयंसेवी संस्था सरसावल्या 

नवी मुंबई- "सकाळ' व नवी मुंबई महापालिकेने राबवलेल्या प्लास्टिकमुक्त नवी मुंबई मोहिमेतून जमा झालेल्या 25 टन प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेच्या क्षेपणभूमीतील प्रकल्पात वा स्वयंसेवी संस्थांना प्लास्टिक सोपवण्यात येणार आहे. याबाबत काही स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेकडे संपर्क साधला असून, जमा झालेल्या प्लास्टिकची मागणी केली आहे. 

नवी मुंबई शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी "सकाळ'च्या सहकार्याने महापालिकेने वेगवान पावले उचलली आहेत. त्यानुसार शहरातील सार्वजनिक जागांवर पडलेले प्लास्टिक जमा करण्यासाठी रविवारी शहरात मोहीम राबवण्यात आली. त्यात संगीतकार शंकर महादेवन, अभिनेत्री जुही चावला यांच्यासह "कलर्स' वाहिनीवरील "कॉमेडीची बुलेट ट्रेन' कार्यक्रमातील हास्यकलाकार अरुण कदम, प्रभाकर मोरे, समीर चौगुले यांच्यासह "सख्या रे' मालिकेतील मुख्य अभिनेता सुयश टिळक व ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे सहभागी झाले होते. त्यामुळे या मोहिमेचे नंतर अभियानात रूपांतर होऊन अवघ्या काही तासांतच तुर्भे येथील क्षेपणभूमीवर 25 टन प्लास्टिकचा ढीग जमा झाला. आता या प्लास्टिकला पुनर्वापरात आणण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. महापालिकेच्या क्षेपणभूमीतील प्रकल्पात या प्लास्टिकपासून प्लेट्‌स बनवता येतील अथवा रस्त्यावर वापरण्यात येणाऱ्या डांबरात ते वापरले जाऊ शकते. जमा झालेले प्लास्टिक मिळविण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनीही महापालिकेकडे संपर्क साधला आहे. त्यांच्यासोबतही महापालिकेची चर्चा सुरू आहे. त्यानंतर या प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी संबंधित संस्थांना देण्यात येणार आहे. 
 

Web Title: mumbai recycling of plastic