
Mumbai:पतंगाच्या मांज्यामध्ये अडकलेल्या दुर्मिळ प्राच्य शिंगाळा घुबडाची सुटका
डोंबिवली - कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरात दुर्मिळ असे प्राच्य शिंगाळा घुबड आढळून आले आहे. पतंगाच्या मांज्यामध्ये ते अडकून पडलेले होते, तसेच उन्हाचा देखील त्याला फटका बसल्यामुळे त्याला उडता येत नव्हते.
पक्षी मित्र महेश बनकर यांनी त्याची मांज्यातून सुटका करत त्याला जीवनदान दिले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. रात्रीच्या वेळेस त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याची माहिती बनकर यांनी दिली.
कल्याण गांधारी परिसरात रिंग रुट जवळील पूलाजवळ मोकळ्या रस्त्यावर अनेक नागरिक सकाळ संध्याकाळ फेरफटका मारत असतात. असेच फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या एक कडेला पक्षी दिसून आला.
त्याला उडता येत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याच्या पायात मांजा अडकला होता व नागरिकांना पाहून तो लांब पळण्यासाठी तडफडत होता. नागरिकांनी याची माहिती पक्षीमित्र महेश बनकर यांना दिली. महेश यांनी तातडीने गांधारी परिसरात धाव घेतली.
सदर पक्षी हा मांज्यात अडकल्याचे व उष्णतेचा ही त्याला त्रास जाणवल्याचे महेश यांना दिसून आले. मांज्यातून घुबडाची सुटका करत त्याला पाणी पाजून त्याची प्रकृती महेश यांनी स्थिर करत त्याला जीवनदान दिले आहे. कल्याणच्या वन विभागास देखील याची माहिती देण्यात आली आहे.
आढळून आलेला पक्षी हा घुबडांच्या प्रजातीतील प्राच्य घुबड असून हा एक दुर्मिळ पक्षी असल्याची माहिती पक्षीमित्र महेश बनकर यांनी दिली. या घुबडा बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
हा घुबड आकाराने इतर घुबडां पेक्षा काहीसा लहान असून गडद पिवळे डोळे आणि गडद तपकिरी रंगाचे पंख अशी त्याची खासियत आहे. हे घुबड पूर्व आणि दक्षिण आशियात सर्वाधिक आढळून येतात असे देखील बनकर यांनी सांगितले.