मुंबईतल्या रेस्टारेंटचे जेवण १० टक्क्याने महागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hotel food

घरघुती गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयाने वाढल्यामुळे आधीच महागाईचा सामना करत असलेल्या गृहीणी मेटाकुटीस आल्या आहेत.

Mumbai Restaurant : मुंबईतल्या रेस्टारेंटचे जेवण १० टक्क्याने महागणार

मुंबई - घरघुती गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयाने वाढल्यामुळे आधीच महागाईचा सामना करत असलेल्या गृहीणी मेटाकुटीस आल्या आहेत. यासोबत व्यावसायिक वापराचा सिलिंडरचे दर तब्बल ३५० रुपयाने वाढल्यामुळे मुंबईकरांचा रेस्टारेंटचा मेन्यू ५ ते १० टक्क्याने महागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात रेस्टारेंटमध्ये जेवणासाठी अधिकचे पैसै मोजण्याची तयारी आता ग्राहकांना ठेवावी लागणार आहे.

पुर्वोत्तर राज्याच्या निवडणूका पार पडल्यानंतर आज सार्वजनिक तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरची दरवाढीची घोषणा केली. यामध्ये व्यावसायिक वापराचा सिलिंडर तब्बल ३५० रुपयाने वाढवला आहे. हॉटेल, रेस्टारेंट आणि ठेल्यावरही व्यावसायिक सिलिंडरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईच्या हॉटेल, रेस्टारेंटमध्ये मेन्युचा दर ५ ते १० टक्क्याने वाढणार असल्याची माहिती आहार या मुंबईतल्या रेस्टारेंट मालकांच्या संघटनेचे अध्यक्ष सुकेश शेट्टी यांनी ‘सकाळ’ला दिली.

आधीच भाजीपाला पासून ते मसाल्याचे दर वाढले आहे. त्यात सिलिंडरचे दर ३५० रुपयाने वाढल्याने त्याचा परिणाम रेस्टारेंटच्या बजेटवर होणार आहे. मध्यम स्वरुपाच्या रेस्टारेंटला दिवसातून सरासरी दोन ते तीन गॅस सिलिंडर लागतात, नव्या दरामुळे दिवसाला १ हजार रुपयाचा बोजा पडणार आहे. म्हणजे महिन्याला ३० हजार रुपये जास्त पडणार आहे. त्यामुळे आम्हाला मेन्युचे दरात ५ ते १० टक्के वाढवणे भाग आहे. असे सुकेश शेट्टी यांनी सांगीतले. मात्र अचानक दरवाढ करणे शक्य होत नाही, कारण भाववाढ केल्यास ग्राहकावर परिणाम पडतो. म्हणून रेस्टारेंट चालक ग्राहक तूटू नये या पध्दतीने दर वाढवतात असेही ते म्हणाले.

दुसरीकडे घरघुती वापराचा गॅस सिलिंडर वाढल्यामुळे घराचे बजेट कोलमडणार असल्याची तक्रार सामान्य गृहीणींनी केली आहे.सरकार फक्त महागाई वाढवत आहे, लोकांनी काय खायचे? गॅस सिलिंडर दररोज वापरावा लागतो. लोकांना किमान दोन वेळचं घरी शिजवून खाता येईल याची तरी सरकारने काळजी घ्यावी अशी संतप्त प्रतिक्रीया कृष्णाबाई शेलार या गृहीणीने दिली आहे.

प्रतिक्रीया

व्यावसायिक वापराचा सिलिंडर आता २११९ ला पडतो. भाजीपाला ते मसाला सर्वच महागलं आहे. त्यामुळे १० टक्के भाववाढ करावी लागणार आहे. मात्र एकदम दरवाढ केल्यास ग्राहक तूटण्याची शक्यता असते, त्यामुळे टप्याटप्याने मेन्युचे दर वाढवले जातील.

- सुकेश शेट्टी ,अध्यक्ष, आहार संघटना

गॅस सिलिंडर 50 ने महाग झाला आहे. पण आमच्या मुलाबाळांचा पगार वर्षानुवर्षे नाही वाढत, कोथिंबीरीच्या जुडीतून उरलेला एक रुपया ही आम्ही गृहीणी सांभाळून ठेवतो. सरकारला गरिबाची अजिबात चिंता नाही, फक्त सर्व महाग होतंय, स्वस्त कधी होणार हा प्रश्न सर्वसामान्यांनी विचारणं सोडले आहे.

- उज्वला काजवे, गृहिणी