Mumbai : वर्दळीच्या रस्त्यांवर भरधाव डंपर अपघाताला कारणीभूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

Mumbai : वर्दळीच्या रस्त्यांवर भरधाव डंपर अपघाताला कारणीभूत

डोंबिवली - शहरातील रस्त्यांवर डंपर चालक भरधाव वेगाने वाहन चालवीत असल्याने ते अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. डोंबिवली मध्ये डंपर चालकाच्या निष्काळजीपणा मुळे एका पादचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला होता.

ही घटना ताजी असतानाच कल्याण पूर्व मध्ये एका डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर जाऊन डंपर आदळल्याची घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही हानी झाली नसली तरी डंपर चालकांच्या वर्दळीच्या रस्त्यांवरील सुसाटपणाला वाहतूक, आरटीओ विभागाने आवर घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्वेतील डॉ. राजेंद्र प्रसाद रोडवर एका बांधकाम कंपनीच्या डंपर चालकाने निष्काळजीपणे डंपर चालविल्याने एका 55 वर्षांच्या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता. दोन महिन्यांपूर्वी दत्तनगर भागात असाच प्रकार घडला होता. कल्याण, डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात अधिकृत, बेकायदा बांधकामे सुरू आहेत.

या बांधकामांसाठी सिमेंट, मिक्सर घेऊन येणारे डंपर चालक शहरातील मध्यवर्ती रस्त्यांवर गर्दीचा विचार न करता भरधाव वेगाने डंपर चालवित आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत.

हे प्रकार यापूर्वी झाले असताना सोमवारी सकाळी कल्याण पूर्वेतील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर विजयनगर भागात एका डंपर चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटले. चालकाने कौशल्याने डंपर रस्ता दुभाजकाला धडकवला. अन्यथा मोठी दुर्घटना या भागात घडली असती, असे येथील नागरिकांनी सांगितले.

कल्याण, डोंबिवली शहर परिसरात सुसाट वेगाने डंपर चालविणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकाऱ्यांनी मोटार वाहन कायद्याने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.