
मुंबई सेंट्रल येथील मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांतर्गत ट्रान्सपोर्ट आणि अवजड वाहन चालक परवाना ऑनलाईन यंत्रणा ठप्प झाली आहे.
Mumbai RTO : वाहन चालक लायसन्स परवान्यासाठी ऑनलाईन तारीख मिळेना
मुंबई - मुंबई सेंट्रल येथील मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांतर्गत ट्रान्सपोर्ट आणि अवजड वाहन चालक परवाना ऑनलाईन यंत्रणा ठप्प झाली आहे. काही ठराविक वेळासाठीच खुली करून पुन्हा बंद केली जात असल्याने चालकांना आपला परवाना काढून घेण्यासाठी तरिखच मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहे. परिणामी वाहन चालक लायसन्स काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आरटीओ मध्ये आल्या पावली परत जावे लागते आहे. गेल्या चार महिन्यांपासून हीच परिस्थिती असल्याने व्यावसायिक दृष्ट्या चालक परवाना काढणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.
नुकतेच परिवहन विभागाने आरटीओतील लायसन्स सबंधित सेवा ऑनलाईन केल्या आहेत. ज्यामध्ये आता पक्का चालक परवाना काढण्यासाठी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने वेळ घेऊन चाचणीसाठी हजर राहायचे असते. मात्र, ऑनलाईन वेळ घेण्याची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. अवघ्या काळासाठी ऑनलाईन यंत्रणा उघडी होऊन पुन्हा बंद करत असल्याने चालकांना चाचणीसाठी वेळ तारीख घेणेही कठीण झाले आहे. परिणामी दैनंदिन नागरिकांकडून ट्रान्सपोर्ट आणि अवजड वाहनाच्या पक्या परवाना चाचणीतून नागरिकांना वंचित राहावे लागते आहे. तर अनेकांचे लर्निग लायसन्स सुद्धा कालबाह्य वेळ आली आहे.
एल एम व्हीं ट्रान्सपोर्टच्या पक्या लायसन्स साठी २० डिसेंबर पासुन प्रयत्न करत आहे पण रोज सकाळी १० वाजता फक्त १ मिनिटासाठी तारीख भेटते नतंर साईट बंद होते आरटीओ तारीख घेण्याची साईड दिवसभर चालु ठेवावी किंवा वेळ तरी वाढुन द्यावी एल एम व्हीं ट्रान्सपोर्ट लायसन्स नसल्यामुळे मला काम ही भेटत नाही त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे असल्याचे वरळी येथील बिडिडी चाळीत राहणारे यश मोरे यांनी सांगितले आहे.