'भाजपने मुंबई बिल्डरांना विकली'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मुंबई - मुंबईचा विकास आराखडा हा मुंबईकरांचा विश्वासघात करणारा असून, भाजपने मुंबई बिल्डरांना विकण्यास काढली आहे. त्यातून कर्नाटक व 2019 च्या निवडणुकीचा खर्च काढण्याचे उद्दिष्ट असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. सावंत म्हणाले की, सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या विकास आराखड्यामध्ये चटईक्षेत्राची बिल्डरांवर मोठ्या प्रमाणात खैरात केल्याने मुंबईकरांनी प्रचंड विरोध केला होता. याच कारणामुळे सदर विकास आराखडा रद्द करून अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिकेने मंजूर केलेल्या आराखड्यात दोनचा चटईक्षेत्र गृहीत धरून आखणी करण्यात आली होती; परंतु राज्य सरकारने मंजूर केलेल्या आराखड्यात पुन्हा चटईक्षेत्राची खिरापत वाटून बिल्डरांवर मोठ्या प्रमाणात मेहेरबानी करण्यात आली आहे.
Web Title: mumbai sale to builder by BJP sachin sawant