
Sanjay Raut : संजय राऊतांचे थुंकणे सापडले वादात; राजकीय वर्तुळातून टिका
मुंबई - आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे खासदार संजय राऊत अजून एका वादात सापडले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आमदार संजय शिरसाट यांचे नाव घेताच संजय राऊत वार्ताहराच्या माईकसमोर थुकले तर शुक्रवारी दुसऱ्यांदा दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत श्रीकांत शिंदे यांच्याबाबत विचारताच राऊत यांनी पुन्हा सलग तीच कृती केली. त्यामुळे राऊत यांची ही कृती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महाविकास आघाडीत घटकपक्षातील नेत्यानींही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.या प्रकारानंतर सावरासावर करत माझ्या जिभेला त्रास झाल्याने मी थुंकलो, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खासदार संजय राऊत दररोज माध्यमांशी संवाद साधताना शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार, खासदार यांच्यावर टीकेचे आसूड ओढत असतात.गुरूवारी संजय शिरसाठ यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारला असताना त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसमोर थुंकण्याचा प्रकार केला. श्रीकांत शिंदे यांनी एका कार्यक्रमात मुंबईतील एक कुटुंब उन्हाळ्यात गारव्यासाठी परदेशात जात असते, अशी टिका उद्धव ठाकरे यांच्यावर केली.या वक्तव्याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी पुन्हा त्या प्रश्नावर थुंकण्याचा प्रकार केला.
संजय राऊत यांच्या या प्रकारानंतर शिवसेना आणि भाजपातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.महाविकास आघाडीतील घटकपक्षातील नेत्यांनी ही आपली राजकीय संस्कृती नव्हे अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्याचे समजते. आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर आमच्या आमदाराच्या मतांवर निवडून येऊन आमच्याच खासदारांवर थुंकणाऱ्या संजय राऊतांनी राजीनामा देऊन जनतेतून निवडून येऊन दाखवावं अस आव्हान शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत यांना दिले. संजय राऊत यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी युवासेनेच्या वतीने शनिवारी आंदोलन करण्यात येणार आहे.
माध्यमांना सीमा आखून घेण्याची गरज
याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारले असता, प्रसार माध्यमांनी अशा बेताल कृती करणाऱ्या राऊत यांना आता किती काळ प्रसिद्धी द्यावी हे ठरवण्याची वेळ आली आहे.माध्यमांनी आता सीमा आखून घेण्याची गरज आहे. नव्या पिढीला काय दाखवणार आहोत याबाबत भूमिका ठरवण्याची वेळ माध्यमांवर आली असल्याचेही डॉ. शिंदे म्हणाले.
'थुंकण्यावर बंदी आहे का? असेल तर सरकारने तसा अध्यादेश काढावा. माझ्या जिभेला त्रास झाला, माझ्या घरात मी होतो. माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो. कुणाला वाटत असेल त्यांच्या नावाने थुंकलो हा त्यांचा प्रश्न आहे. काही लोकांचं नाव आलं आणि जीभ दाताखाली आली.
- संजय राऊत, खासदार
आज टीकेचा स्तर हा घसरतोय. मात्र सर्वच पक्षाच्या बाबतीत होत आहे. राजकारणाचा सामाजिक स्तर खालावतो आहे. संजय राऊत स्वतः एक पत्रकार आहेत. त्यांनी केलेल्या कृतीचे परिणामही त्यांना ठाऊक आहेत. संजय राऊतांचे हे उध्दव ठाकरे गटाचे अधिकृत प्रवक्ते आहेत. त्यांची ही कृतीही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? हे त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी पुढे येऊन स्पष्ट केले पाहिजे.
- संजय पाटील, राजकीय विश्लेषक