
Mumbai : मुंबईतील नालेसफाई ३५ टक्क्यांपेक्षा अधिक नाही; विरोधी पक्षातील नेत्याचा दावा
मुंबई - नालेसफाई १००.५१ टक्के झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. नाले सफाईची पोल खोल पहिल्या पावसानंतर उघड होईल. गाळ किती काढला, तो कुठे टाकला, सीसी कॅमेरे लावून गाळ काढण्याचे काम का झाले नाही, असे अनेक प्रश्न नागरीकांच्या मनात आहे. नालेसफाई ही केवळ धुळफेक असून नालेसफाई केवळ ३५ टक्केच झाल्याचा आरोप माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.
यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. आतापर्यंत ९ लाख ८४ हजार ९२७ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या १००.५१ टक्के गाळ काढण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने कंत्राटांमध्ये यंदा अधिक सक्त अटी व शर्तींचा समावेश केला आहे.
प्रत्येक कामासाठी दृकश्राव्य चित्रफित (व्हिडिओ क्लीप) आणि छायाचित्रे सादर करणे बंधनकारक केले आहे. काम सुरु होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरु असताना आणि काम संपल्यानंतर अशा तिनही टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअलटाइम जिओ टॅग) यासह चित्रफित व छायाचित्रे तयार करुन ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना बंधनकारक केले आहे.
असे छायाचित्रण व चित्रफित तयार करताना दररोज नाल्यांमधून गाळ काढल्यानंतर तो ठेवल्याची जागा, नाल्याकाठची दैनंदिन छायाचित्रे, सदर गाळ डंपरमध्ये भरण्यापूर्वी डंपर पूर्ण रिकामा असल्याचे दर्शविणारे चित्रण, डंपरमध्ये गाळ भरताना आणि भरल्यानंतरचे चित्रण, गाळ वाहून नेल्यानंतर क्षेपणभूमीवर आलेल्या व जाणा-या डंपर वाहनांच्या क्रमांकाची तसेच वेळेची नोंद करणे, क्षेपणभूमीवर येणा-या - जाणा-या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे ही सर्व जबाबदारी कंत्राटदारांकडून घेण्यात आल्य़ाचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
ही सर्व मुंबईकरांच्या डोळ्यात धुळफेक असून यंदा नालेसफाईची कामे योग्य रित्या झालेली नाहीत. नालेसफाई केवळ ३५ टक्केच झाली आहे. गाळ काढलेला कुणी पाहिला नाही. गाळ काढून तो उचला गेल्याचे कुणी पाहिलेले नाही. सीसी यंत्रणेच्या नियंत्राखाली नालेसफाई झाली नाही. गाळ कुठे टाकला, कुणालाही माहित नाही. ती जागाही कुणारा ठाऊक नाही, अशी माहिती माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली. गाळ टाकण्याची ठिकाणी कोणती ते दाखविण्यात यावे असेही त्यांनी म्हटले आहे.