जिग्नेश, खालीदच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली; अटकसत्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

छात्र भारतीचे अधिवेशन हे तीन महिन्यांपूर्वी ठरले होते. आता काही वेळा पूर्वी पोलिसांनी ही परवानगी नाकारली. रात्री आम्हाला ही नोटीस दिली असती तरी आम्ही हा कार्यक्रम रद्द केला असता. देशभरातून विद्यार्थी कार्यकर्ते आल्यानंतर पोलिसांची ही दडपशाही सुरू आहे, असा छात्रभारतीच्या विद्यार्थ्यांनी आरोप केला.

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरण आणि महाराष्ट्र बंदनंतर आज (गुरुवार) छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय छात्र संमेलन या जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच शिक्षक आमदार कपिल पाटील आणि छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. 

विलेपार्लेच्या भाईदास सभागृहात सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संमेलन होणार होते. संमेलनात मेवानी, खालीदसह लढाऊ विद्यार्थी नेत्या रिचा सिंग, प्रदीप नरवाल, बेदाब्रता गोगई आणि छात्र भारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. पण, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारत याठिकाणी जमलेल्या विद्यार्थ्यांना अटक केली. पोलिसांनी याठिकाणी जमावबंदी लागू केली आहे.

छात्र भारतीचे अधिवेशन हे तीन महिन्यांपूर्वी ठरले होते. आता काही वेळा पूर्वी पोलिसांनी ही परवानगी नाकारली. रात्री आम्हाला ही नोटीस दिली असती तरी आम्ही हा कार्यक्रम रद्द केला असता. देशभरातून विद्यार्थी कार्यकर्ते आल्यानंतर पोलिसांची ही दडपशाही सुरू आहे, असा छात्रभारतीच्या विद्यार्थ्यांनी आरोप केला.
 
दिवसभर चालणाऱ्या संमेलनात शिक्षण व्यवस्था, विद्यार्थी चळवळ आणि विद्यार्थ्यांच्या कळीच्या प्रश्‍नांवर विचारमंथन होणार होते. संमेलनात युवा शायर फैजान अंजुम, रमणिक सिंग, मोहम्मद सदरीवाला यांचा "कुछ नज्मे और कुछ बाते' असा बहारदार कार्यक्रमही होणार होता. राज्यभरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी संमेलनात सहभागी होणार होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष सिद्धार्थ मल्या, निमंत्रक सागर भालेराव, सहनिमंत्रक सचिन बनसोडे, नीलकबीर, आदित्य मदनानी, रोहित ढाले, अमरीन मोगर होते.

Web Title: Mumbai Students gathered for Chhatra Bharati event outside Bhaidas Hall, being forcibly removed