
Mumbai : शिवाजी महाराज आरमार प्रतिकृतीची शान T - 80 युद्धनौका कल्याणात दाखल
डोंबिवली : भारतीय नौदलात 23 वर्षे सेवा देत पराक्रमी शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाणारी T 80 ही युद्धनौका आता छत्रपती शिवाजी महाराज आरमाराच्या प्रतिकृतीची शान वाढविणार आहे. रविवारी कल्याण खाडी किनारी ही युद्धनौका दाखल झाली आहे. शिवाजी महाराजांनी कल्याण खाडी किनारी आपल्या पहिल्या आरमाराची स्थापना केली होती.
हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत दुर्गाडी किल्ल्याजवळ 2.5 किमी लांबीचा नदी किनारा व नौदल संग्रहालय विकसित करण्यात येत आहे. याचाच ही युद्धनौका एक भाग असून नौदल आरमाराची प्रतिकृती उभारली जात नाही तोपर्यंत या युद्धनौकेचे संरक्षण करण्याचे आव्हान देखील पालिका प्रशासनासमोर आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे पहिल्या आरमाराची स्थापना कल्याणच्या खाडी किनारी केली. तेव्हापासून कल्याण शहराला ऐतिहासिक दर्जा प्राप्त झाला आहे. हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी शिवरायांचे कर्तृत्व, दूरदृष्टी आणि पराक्रमाची साक्ष म्हणून कल्याण खाडी किनारी नौदल स्मारक केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत उभारले जात आहे.
याअंतर्गत दुर्गाडी किल्ल्याजवळ 2.5 किमी लांबीचा नदी किनारा सुशोभित व नौदल संग्रहालय उभारले जाणार आहे. याठिकाणी लॅंड स्कॅपिंग, सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, दुर्गाडी किल्ल्याजवळ बगिचा विकसित करणे, लहान मुलांसाठी प्ले एरीया, पार्किंग, आरमार प्रतिकृी संग्रहालय उभारले जाणार आहे. यासाठी केंद्र शासनाचा 50 टक्के निधी, राज्य व पालिका प्रशासनाचा प्रत्येकी 25 टक्के निधी खर्च केला जाणार आहे. जानेवारी 2024 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे.
कल्याणच्या दुर्गाडी सागरी किल्ल्याजवळ भारतीय नौदलाची निवृत्त फास्ट अटॅक क्राफ्ट T- 80 ही युद्धनौका स्मारक म्हणून प्रदर्शित करण्यासाठी भारतीय नौदल आणि एसकेडीसीएल यांच्यात
नोव्हेंबर महिन्यात सामंजस्य करार झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा नौदलाच्या स्थापनेच्या 365 व्या वर्धापन दिनानिमित्त हा करार करण्यात आला. त्यानुसार ही युद्धनौका रविवारी दुपारी कल्याणच्या खाडीकिनारी विराजमान झाली.
गुरुवारी मुंबई कुलाबा येथील नौदलाच्या डॉकयार्ड मधून जलमार्गाने ही युद्धनौका कल्याण येथे आणण्यात आली आहे. यावेळी रिअर ॲडमिरल ए. एन. प्रमोद, कमांडर जीलेट कोशी, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, तत्कालीन केडीएमसी आयुक्त आणि विद्यमान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, शहर अभियंता अर्जुन अहिरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
T 80 चा पराक्रम
इनफॅक-टी-80 ही युद्धनौका 7 ऑक्टोबर 2021 रोजी 23 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाली. इस्रायल येथे मेसर्स आयएएल रामता या कंपनीने बांधलेले हे जहाज 24 जून 1998 रोजी कार्यान्वित करण्यात आले. ही नौका विशेषतः उथळ पाण्यातील मोहिमांसाठी तयार करण्यात आली होती. मुंबई हाय ऑफशोअर डेव्हलपमेंट एरिया आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गस्त घालण्याचे काम या नौकेने केले आहे.
निवृत्तीनंतरही ही नौका देशाची सेवा करत राहील आणि कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यातील नौदल संग्रहालयाला भेट देणाऱ्या भारतीय तरुणांना प्रेरणा देईल. या स्मारकात राज्याच्या समृद्ध सागरी इतिहासाचे, विशेषत: मराठा नौदल आणि भारतीय नौदलाने त्यात बजावलेल्या भूमिकेचे दर्शन घडेल. भारतीय नौदलाने यापूर्वी एस्सेल वर्ल्ड येथे सेवा निवृत्त युद्धनौका एक्स-प्रबल स्मारक रूपात उभारली होती.
सुरक्षिततेचे आव्हान
स्मारक उभारणीच्या कामास अद्याप एक वर्ष बाकी असून तोपर्यंत खाडी किनारी उभ्या असणाऱ्या या युद्धनौकेचे संरक्षण करणे ही मोठी जबाबदारी पालिका प्रशासनावर असणार आहे. सध्या युद्धनौका चारही बाजूने पत्रे ठोकून सुरक्षित करण्यात येत आहे. मात्र गणेश घाट परिसरात आजूबाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात अनेक गर्दुल्ले, भिकारी रात्रीच्या वेळेस येतात.
हा परिसर निर्जन स्थळ असल्याने येथे सातत्याने देखरेख प्रशासनास करावी लागणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत हे काम होत असले तरी तरी युद्धनौकेस कोणतीही हानी होऊ नये याची दक्षता पालिकेस घ्यावी लागणार आहे.