
Mumbai : तळीरामांचा प्रताप! दारू पिताना हटकल्याने पोलिसांवर हल्ला; आरोपींना अटक
अंधेरी - गस्त घालणार्या पोलिसांशी हुज्जत घालणार्या चार तरुणांना मालवणी पोलिसांनी अटक केली. या तरुणांनी पोलीस ठाण्यात भिंतीवर डोके आणि तोंड आपटून पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे.
सनी भारत गिल, समीर माजिद शेख, कुमार सिंह आणि श्रीशेष व्यकंटराव जाधव अशी या चौघांची नावे असून अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने गुरुवार २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडेतीन वाजता मालाडच्या जनकल्याणनगर, सेंट ज्यूड स्कूलजवळील म्युन्सीपल मैदानात घडली. रात्री उशिरा या ठिकाणी काही तरुण मद्यप्राशन करुन गोंधळ घालत होते.
यावेळी गस्त घालणार्या मालवणी पोलिसांच्या एका विशेष पथकाने त्यांना तिथे गोंधळ घालू नका, घरी निघून जा असा सल्ला दिला. यावेळी या तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांनाच शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. एका तरुणाने पोलीस शिपाई कैलास नाना मोरे यांना हाताने मारहाण केली. त्यात त्यांच्या मानेला दुखापत झाली होती. त्यानंतर या चौघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी स्वतचे डोके आणि तोंड भिंतीवर आपटून स्वतला दुखापत केली. पोलिसांना शिवीगाळ करुन त्यांनीच त्यांना मारहाण केल्याचा खोटा आरोप केला. तसेच पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेनंतर या चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच सनी गिल, समीर शेख, कुमार सिंह आणि श्रीशेष जाधव या चौघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.