मुंबईत रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच, 'या' जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

पूजा विचारे
Wednesday, 23 September 2020

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय.  गेल्या आठवड्यात शनिवारी संध्याकाळी सुरु झालेल्या पावसानं मंगळवारी रात्री पुन्हा एकदा जोर धरला.

मुंबईः  मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय.  गेल्या आठवड्यात शनिवारी संध्याकाळी सुरु झालेल्या पावसानं मंगळवारी रात्री पुन्हा एकदा जोर धरला. आज सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

येत्या २४ तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरांतही पावसाने धुमाकूळ घातला आहे. कुर्ला-दादर दरम्यान रुळांवर पाणी साचलं असून मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

 
सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची झोप उडाली. पावसामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे ठप्प झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे, सीएसएमटी ते वाशी आणि चर्चगेट ते अंधेरी दरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. ठाणे ते कर्जत/कसारा, वाशी ते पनवेल आणि अंधेरी ते विरार शटल सर्व्हिस सुरू आहे.

 

चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या अंधेरी ते विरार दरम्यान लोकल सेवा सुरू आहेत. तर दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावरही रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा सुरू आहेत.

मुंबईत सकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा परिसरात १२२.२ मिमी आणि सांताक्रुझ येथे २७३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.  वरळी परिसरातील बीएमसी कर्मचाऱ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं त्यांची तारांबळ उडाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सीबीडी बेलापूर येथे सर्वत्र पाणी शिरलं आहे.

Mumbai Thane Rain continues waterlogging suburban train service suspended


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Thane Rain continues waterlogging suburban train service suspended