
Mumbai Traffic : वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन नसल्याने मानपाडा रस्त्यावर वाहनांची कोंडी
डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्याचे सीमेंट कॉंक्रीटीकरणचे काम अत्यंत संथगतीने सुरु असून सागावं ते देसलेपाडा रोडवर वाहनांची कोंडी होत आहे. या ठिकाणी एका दिशेचे रस्त्याचे काम सुरु असून दुसऱ्या अरुंद रस्त्यावरुन वाहनांची वर्दळ सुरू आहे. मानपाडा रोड मार्गे कल्याण शीळ रोडला जाणारी वाहने ही सागावं येथे पिंपळेश्वर मंदिर मार्गे वळविण्यात आली आहेत.
हा रस्ता अरुंद आणि खराब असल्याने अनेक वाहन चालक देसले रोड मार्गे दिवा आगासन रोड गाठून कल्याण शीळ रोड जाणे पसंत करतात. मात्र यामुळे सागावं ते पिंपळेश्वर या पट्ट्यात वाहन कोंडी होत आहे. त्यात डी मार्ट येथे खरेदीसाठी येणारी वाहने, रिक्षा थांबे यांचा खोळंबा होत असून वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन नसल्याने या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात.

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोड हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असा मार्ग आहे. या रस्त्याची गेले अनेक वर्षे दुरुस्ती झाली नसल्याने पावसाळ्यात खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. अखेर या रस्त्याचे सीमेंट कॉंक्रीटकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. एमएमआरडीएच्या वतीने रस्त्याचे काम करण्यात येत आहे.
मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. गुन्हे शाखा ते डि मार्ट येथील रस्त्याचे काम करण्यात आले आहे. तर त्यापुढील टप्पा म्हणजेच डि मार्ट ते देसलेपाडा, सागाव या टप्प्याचे काम आता हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणी रस्त्याचे एका मार्गिकेचे काम सुरु असल्याने दुसरी मार्गिका ही वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात आली आहे.
मात्र हा अरुंद रस्ता आणि वाहनांची संख्या जास्त असल्याने सागावं ते देसलेपाडा कमान या ठिकाणी कायम वाहनांची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. डि मार्ट येथे जाणारी वाहने, देसलेपाडा मार्गे जाणारी वाहने, दिवा आगासन रोड मार्गे जाणारी वाहने, तसेच स्थानिक नागरिकांची वाहने आणि रिक्षा या मार्गाचा वापर करत असल्याने ते या कोंडीत अडकतात.
अवजड वाहन आल्यास तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. भर उन्हात वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना घामघुम होत कोंडीतून मार्ग काढावा लागत असल्याने त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे. या रस्त्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात यावे. रहदारीसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून वेळेत काम पूर्ण करुन वाहन कोडीची समस्या सोडवावी अशी मागणी नागरिक करत आहे.