पुन्हा जलमय

पुन्हा जलमय

मुंबई - मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरात कोसळणाऱ्या संततधार पावसाने नागरिकांची दैना उडवली. मध्य मुंबईत दादर आणि माटुंगासह पूर्व उपनगरात शीव, कुर्ला, टिळकनगर आदी भागांत अनेक ठिकाणी सखल ठिकाणी पाणी साचले. अंधेरीतील पूल दुर्घटनेमुळे पश्‍चिम रेल्वे बंद पडली. त्यामुळे नागरिकांनी मिळेल तो पर्यायी मार्ग स्वीकारत आपली कार्यालये गाठली. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. वाहनचालक पावसामुळे बंद पडलेली वाहने ढकलत आपल्या इच्छित स्थळी पोहोचत होते. दिवसभर सुरू असलेल्या पावसाने सायंकाळी थोडीशी उसंत घेतली़, मात्र वाहतूक पूर्वपदावर आलेली नव्हती.

बोरिवली आणि दहिसरमध्ये  रस्ते झाले जलमय
दहिसर - दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबई महापालिकेने केलेल्या नालेसफाईची पोलखोल केली आहे. बोरिवलीतील देवीपाडा, काजूपाडा, श्रीकृष्णनगर पश्‍चिमेकडे बाभाई, एस. व्ही. रोड, योगीनगर, आय. सी. कॉलनी भागात पाणी साचले होते. 

दहिसरच्या केतकीपाडा, रावळपाडा, आनंदनगर सब वे, कांदरपाडा आदी भागात पाणी तुंबले होते. दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली. अंधेरीतील दुर्घटनेमुळे अनेक चाकरमान्यांनी घरी राहणेच पसंत केले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर चिखल साचला होता. त्यातूनच चाकरमानी वाट काढत घरी परतत होते.

रुग्णवाहिकेने काढला  साचलेल्या पाण्यातून मार्ग 
प्रभादेवी  - मुसळधार पावसात साचणाऱ्या हिंदमाता परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. पावसाचा फटका एका रुग्णवाहिकेलाही बसला. चित्रा सिनेपासून हिंदमाता-परळपर्यंत पाणी भरल्याने पोलिसांनी वाहतूक उड्डाणपुलावरून वळवल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्या वेळी आलेल्या रुग्णवाहिकेला बंद केलेला मार्ग खुला करून देण्यात आला.

मानखुर्द झोपडपट्टीत पाणी 
मानखुर्द  - मुंबईत दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. मंगळवारी सकाळपासून या भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. महात्मा फुलेनगर, महाराष्ट्रनगर व मंडाळा झोपडपट्टीच्या काही भागात पाणी साचले होते. मंगळवारी मानखुर्दमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. 

वादळी वाऱ्यासह जोरदार सरी कोसळल्याने चेंबूर चिल्ड्रेन्स होम व भाभा अणुसंशोधन केंद्र परिसरात काही झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या डोंगराकडून येणारा नाला भरून वाहत होता. झोपडपट्टी परिसरात काही ठिकाणी पाणी साचले होते. महाराष्ट्रनगर, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प व म्हाडा वसाहतीतून मानखुर्द स्थानकाकडे जाणारी पायवाट पाण्याखाली गेली होती. प्रवासी रेल्वे रुळावरून मार्ग काढत होते.

टिळकनगरमध्ये रेल्वे वसाहतीत पाणी
वडाळा - जोरदार पावसाचा फटका टिळकनगर स्थानकालगतच्या रेल्वे कर्मचारी वसाहतीलाही बसला. रात्रभर सुरू असलेल्या संतत धारेमुळे पाणी तुंबले. या वसाहतीतून बाहेर पडणे अवघड होत आहे. रहिवाशांची वाहने पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. 

मालवणीतील घरांमध्ये पाणी शिरले
मालाड  - दिवसभर मुसळधार बरसत असलेल्या पावसामुळे मालवणी गेट क्रमांक ८ येथील आंबोजवाडीतील मोनिया मशीद, श्‍याम तलावालगतच्या चाळीत पाणी शिरले. येथील रहिवाशांनी स्वत- पाण्याचा निचरा करण्यासाठी गटार खणून वाट बनवली; मात्र महापालिकेकडून कोणतीही कामे झालेली नाहीत. जुने, नवे कलेक्‍टर कंपाऊंडच्या भागातही पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

माटुंगा भागात पाणीच पाणी
शिवडी - माटुंगा व किंग्ज सर्कल रोडच्या मुख्य मार्गावर मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले होते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागत होती. उघड्या गटारांची भीतीही प्रवाशांच्या मनात होती. वाहनचालकांनाही याचा फटका बसला. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरले होते. काही दुकानमालकांचे मोठे नुकसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com