नव्या वर्षात मुंबईचे ‘आस्ते कदम’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मुंबई - नव्या वर्षात मुंबईतील वाहतुकीचा वेग आणखी मंदावण्याची शक्‍यता आहे. मेट्रो रेल्वेचे काम, दुरुस्तीसाठी बंद असलेले महत्त्वाचे पूल आणि रस्त्यांची दुरुस्ती अशा तिहेरी संकटामुळे शहरातील वाहतुकीचे बारा वाजणार आहेत.

मुंबई - नव्या वर्षात मुंबईतील वाहतुकीचा वेग आणखी मंदावण्याची शक्‍यता आहे. मेट्रो रेल्वेचे काम, दुरुस्तीसाठी बंद असलेले महत्त्वाचे पूल आणि रस्त्यांची दुरुस्ती अशा तिहेरी संकटामुळे शहरातील वाहतुकीचे बारा वाजणार आहेत.

दहिसरपासून कुलाब्यापर्यंत वाहतूक कोंडीचा विळखा कायम राहणार आहे. पूर्व आणि पश्‍चिम उपनगरांत मेट्रो रेल्वेच्या विविध टप्प्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर जंक्‍शनपासून वाहतूक कोंडी होत आहे. लालबहादूर शास्त्री मार्गावरील कोंडीची समस्या अधिक तीव्र झाली असून, पश्‍चिम द्रुतगती मार्गाची तशीच अवस्था आहे. त्यातच महापालिकेने रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.

उपनगरांतून कासवगतीने दक्षिण मुंबईत आल्यावर वाहनांची गती वाढत असल्याने चालकांना दिलासा मिळत होता. आता लोअर परळमधील रेल्वे क्रॉसिंग पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याचा परिणाम धारावी आणि माहीमपर्यंत दिसत आहे. त्यातच शीवमधील उड्डाणपूल बंद होण्याची शक्‍यता आहे. तो पावसाळ्यापर्यंत बंद राहणार असल्याने कोंडीत भर पडणार आहे.

सध्या मुंबईत रस्तेदुरुस्ती जोरात सुरू आहे. आता लहान रस्त्यांचीही दुरुस्ती होणार आहे. महापालिकेला पावसाळ्यापूर्वी एक हजारहून अधिक रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करायची आहेत. त्यामुळे मुंबईकरांना अगदी घरातून बाहेर निघाल्यापासूनच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.

शीव भागात खोळंबा  
 शीव उड्डाणपूल बंद झाल्यावर पूर्व उपनगरांतून दक्षिण मुंबईत येण्यासाठी बीपीटी रोड, पूर्व उन्नत मार्गावरील वाहतुकीच्या भारात वाढ. त्यामुळे तेथेही कोंडी होण्याची शक्‍यता.
शीव येथून धारावीकडे आणि दक्षिण, मध्य मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढणार. त्यामुळे शीव जंक्‍शनला वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्‍यता.

रस्तेदुरुस्तीचा फटका 
नरिमन पॉईंट, रामचंदानी मार्ग (कुलाबा), स्वामी विवेकानंद मार्ग (अंधेरी ते वांद्रे) आणि दहिसर लिंक रोड.

Web Title: Mumbai transport slow in the new year