Mumbai News: उंबार्ली टेकडी परिसरातील रोपांची नासधूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai News

Mumbai News: उंबार्ली टेकडी परिसरातील रोपांची नासधूस

डोंबिवली : डोंबिवली जवळील उंबार्ली खोणी टेकडी परिसरातील रोपांची काही समाज कंटकांकडून नासधूस करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी असलेला नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचा फलक फाडून टाकण्यात आला आहे.

सकाळी टेकडीवर फेरफटका मारण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. यापूर्वीही उंबार्ली टेकडी परिसरात आग लागून झाडांचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता तर रोपच उपटून टाकण्यात आल्याने या गोष्टी जाणून बूजुन केल्या जात असल्याची चर्चा होत आहे.

डोंबिवली जवळील उंबार्ली टेकडी परिसर वनराईने नटलेला असून तो ऑक्सिजन झोन म्हणून ओळखला जातो. या टेकडीवरील वनराईचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांसह अनेक संस्था आज कार्यरत आहेत.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, पर्यावरण प्रेमी, वन विभाग यांच्यावतीने या टेकडीवर हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सार्वजनिक सुट्ट्यांचा सदुपयोग करत स्वयंसेवकांनी सकाळ संध्याकाळ काम करत या परिसरात वृक्ष संवर्धनासाठी नैसर्गिक तळी, पाण्याच्या टाक्या बसवून पाणी पुरवठा टेकडीवर केला आहे. सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी या वृक्षांची देखभाल करतात.

गेल्या काही वर्षांपासून या टेकडीवर वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यानंतर आता या ठिकाणी लावण्यात आलेल्या रोपांची समाजकंटकांकडून नासधूस करण्यात आल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

उंबार्ली टेकडीवरील खोणी गावाजवळील बाजूस नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान चा फलक असून या ठिकाणी रोपांची लागवड करण्यात आली आहे. हा फलक फाडून टाकत त्या ठिकाणी रोपे उपटून टाकण्यात आली आहेत. शुक्रवारी पहाटे टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आली आहे.