Mumbai : अमृत योजनेंतर्गत पाण्याच्या टाकीची कामे चुकीच्या पद्धतीने सुरू; आमदार राजू पाटील भडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mla raju patil

Mumbai : अमृत योजनेंतर्गत पाण्याच्या टाकीची कामे चुकीच्या पद्धतीने सुरू; आमदार राजू पाटील भडकले

डोंबिवली - केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत केडीएमसीच्या 27 गावांत पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे. या अंतर्गत पाण्याच्या टाकी उभारणी चे काम सुरू असून ही कामे योग्य पध्दतीने केली जात नसल्याच्या तक्रारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्याकडे आल्या होत्या.

मंगळवारी आमदारांनी कामाची पाहणी करत काही त्रुटी आढळून आल्याने अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी आमदार पाटील यांनी काम योग्य पद्धतीने सुरू आहे का असे विचारल्यावर अधिकारी घाबरते. आमदारांनी त्यांना जवळ बोलावताच ते न आल्याने आमदारांनी "काही करत नाही इकडे या पहा आणि मला सांगा" असे म्हणत बोलावलं,

अधिकाऱ्यांची गाळण उडाल्याने आमदारांनी दरडावत "इकडे नाही आलात तर मारील" असे बोलताच अधिकाऱ्यांनी संबंधित कामाची तपासणी करण्यात येईल असं सांगितले.कल्याण ग्रामीण भागात पाण्याची टंचाई कायम असून या भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी या भागात केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून काम करण्यात येत आहे.

योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील काम करण्यात येत असून पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम गावागावांत सुरू आहे. गेल्या 3 वर्षांपासून ही कामे सुरू असून काम लवकर होण्यासाठी आमदार पाटील हे पाठपुरावा करत आहेत.

काटई, भोपर येथे सुरू असलेले टाकी उभारण्याचे काम योग्य पध्दतीने होत नसल्याची तक्रार कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्याकडे आली होती. त्यातच भोपर येथे टाकीचे काम सुरू असताना टाकीचा काही भाग कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

आमदार पाटील यांनी मंगळवारी सकाळी काटई गावात जाऊन प्रत्यक्ष पहाणी केली यावेळी त्यांना कामात अनेक त्रुटी आढळून आल्या. यावेळी अमृत जल योजनेचे प्रभारी कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी यांसह इतर साईड अभियंता श्रीकृष्ण उपस्थित होते. आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे काम योग्य पध्दतीने सुरू आहे का ? असे विचारलं. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांना देता येत नसल्याने आमदार आणखी भडकले.

हे कशा पद्धतीने काम सुरू आहे. अशा पद्धतीने आमच्याकडे चाळ पण बांधत नाही तुम्ही तरी पाण्याच्या टाक्या बांधतायत असे खडे बोल आमदार पाटील यांनी सुनावले. कामाच्या गुणवत्तेविषयी जबाबदार अधिकाऱ्याची लेखी तक्रार करून कारवाई करण्याची सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अमृत योजनेतील काम सुरू आहेत, त्यात कोणतीही योग्य पद्धत वापरली जात नाही आहे. पाईपलाईन ची कामे करताना रस्त्यांची वाट लावली. त्यानंतर टाकी उभारण्यास जागा नव्हती. टाकी उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली तर काम अशा पध्दतीने केली जात आहेत की, भोपर येथे स्लॅब भरताना त्याचे सेंटरिंग पडले ते पहायला जातो तेच माझ्याच गावात काटई येथे स्लॅब बांधताना एका साईड पडल्याचे समजले.

बांधकामास खालपासून वर पर्यंत सपोर्ट दिला जात नाही. 9 लाख लिटरच्या टाक्या आहेत त्या आरएमसी ने भरणे गरजेचे असताना इथेच माल बनवून त्या भरल्या जात आहेत. अशा पद्धतीने आमच्या चाळी देखील बनवत नाहीत.

ठेकेदारांकडून इथल्या सत्ताधाऱ्यांनी करोडो च्या गाड्याही घेतल्या असल्याचे आमच्या कानावर आले अशी कामे बघितल्यावर त्यात तथ्य असल्याचे जाणवते. ठेकेदाराच्या गुणवत्तेबद्दल लेखी तक्रार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच विजेटीआयकडून ऑडिट करण्याचे देखील सांगण्यात आले आहे.

अनेक ठिकाणी कामे रखडली आहेत. कोळेगाव येथे टॅपिंगचे काम झालेले नाही, गावकऱ्यांचा विरोध असतानाही टॅपिंग साठी जागा करून दिली. पण काम तत्परतेने झाले नाही. जर हे काम झाले असते तर 18 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला असता. सत्ताधारी गावात कृत्रिम पाणी टंचाई कशी निर्माण करता येईल आणि निवडणुकीपर्यंत हा प्रश्न कसा खेचता येईल हेच पाहतात. आयत्यावेळी लोकांना समाधान द्यायचं आणि मते घ्यायची ही नाटकं सगळी सुरू आहेत.

अमृत योजना ही 27 गावांसाठी असून त्यातील 18 गावे ही माझ्या मतदारसंघात येत असल्याने त्याचा वचपा कुठेतरी काढला जात असेल, हे मला माहित नाही परंतु ही पद्धत बरोबर नाही लोकांचे पाणी तोडून विकासाचे प्रश्न रखडवन योग्य नाही. हे असं कोणाला पुण्य नाही मिळणार.

राजू पाटील, कल्याण ग्रामीण आमदार

टाकीचे स्लॅब चा पोशन भरताना सेंटरिंग लूज झाल्याने ते पडले, स्लॅब कोसळले नाही. भोपर येथे स्लॅबचे कास्टिंग सुरू होते, सेंटरिंग मध्ये प्रॉब्लेम झाल्याने ते पडले. याविषयी संबंधितांना कळविण्यात आले आहे. ते उद्या पाहणी करून आम्हाला अहवाल देतील. व्हीजेटीआय कडून देखील ऑडिट करून घेण्यात येईल.

शैलेश कुलकर्णी, प्रभारी कार्यकारी अभियंता, अमृत जल योजना

टॅग्स :Mumbai News