कारभार लाजिरवाणा अन्‌ एक्‍झिटही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

संजय देशमुखांच्या कारकिर्दीत विद्यापीठ कारभाराचे अक्षरश: भजे झाले. उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासणीचा देशमुखांनी दामटलेला निर्णय त्यांच्या मुळावर येणार, हे दिसतच होते. अपुऱ्या व्यवस्थेनिशी उचललेले हे पाऊल घातकी ठरले. सहा महिने उलटून गेले; पण आजही अनेक निकाल टांगणीवरच आहेत, यात सारे काही आले!

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांना अखेर हकालपट्टीला सामोरे जावे लागले. त्यांनीच स्वत:वर ही वेळ ओढवून घेतली असेच म्हणावे लागेल. सन्मानपूर्वक पायउतार होण्याच्या अनेक संधी त्यांना कुलपती विद्यासागर राव आणि देशमुखांच्या सत्ताधारी पक्षातील सहानुभूतीदारांनी दिल्या होत्या; पण दीर्घ रजेवर रवानगी केल्यानंतरही ते चिकटपणाने पुनःश्‍च रुजू झाले आणि ही नालस्ती त्यांनी ओढवून घेतली. यात त्यांची व्यक्‍तिगत हानी तर आहेच; पण मुंबई विद्यापीठासाठीही ही घटना काहीशी लाजिरवाणीच मानावी लागेल. तब्बल 160 वर्षांचा उज्ज्वल इतिहास लाभलेल्या या विद्यापीठाकडे जगभर अपेक्षेने पाहिले जाते. किंबहुना मुंबई विद्यापीठाकडे पाहूनच भारतातील शिक्षण क्षेत्राची जागतिक प्रतिमा ठरते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये; पण गेल्या काही वर्षांत मात्र या विद्यापीठाला अंतर्गत राजकारण आणि वादग्रस्त नेतृत्वाची लागण झाली आणि प्रतिष्ठेचा हा मनोरा खचू लागला. माजी कुलगुरू राजन वेळूकर यांची कारकीर्दही वादातच गुरफटली. त्यांच्याकडून सूत्रे स्वीकारणाऱ्या संजय देशमुखांच्या कारकिर्दीत विद्यापीठ कारभाराचे अक्षरश: भजे झाले. उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासणीचा देशमुखांनी दामटलेला निर्णय त्यांच्या मुळावर येणार, हे दिसतच होते. अपुऱ्या व्यवस्थेनिशी उचललेले हे पाऊल घातकी ठरले. सहा महिने उलटून गेले; पण आजही अनेक निकाल टांगणीवरच आहेत, यात सारे काही आले! वास्तविक या ऑनलाइन निर्णयाला बहुतेकांनी विरोध केलेला होता. संभाव्य धोक्‍यांचीही चर्चा झाली होती. देशमुखांनी कुणाचेही न ऐकता शेकडो विद्यार्थ्यांच्या करिअरचे नुकसान केले. एकेकाळी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील संशोधन विभागात छाप उमटवणारे देशमुख सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतले होते; परंतु प्रबोधिनीतला अनुभव मुंबई विद्यापीठासारखा अवाढव्य पसारा सांभाळण्यासाठी पुरेसा नसतो, हे भान त्यांची नियुक्‍ती करणाऱ्या ना सत्ताधाऱ्यांना होते, ना खुद्द कुलगुरूंना. सत्तेच्या साठमारीत बळी गेला तो बिचाऱ्या विद्यार्थ्यांचा. विद्यापीठाचे नवे कुलगुरू निवडताना तरी काटेकोर काळजी घेणे, आता अपेक्षित आहे; अन्यथा पहिले पाढे पंचावन्न हाच अनुभव विद्यार्थ्यांच्या गाठीला येणार, हे खरेच.
Web Title: mumbai university