मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा 15 सप्टेंबरपासून? महाविद्यालये ऑनलाईन परीक्षेला तयार 

तेजस वाघमारे
Sunday, 6 September 2020

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत आदेश दिल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठाना परीक्षेचे नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत आदेश दिल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठाना परीक्षेचे नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शनिवारी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी याबाबत प्राचार्यांची बैठक घेतली. या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षा 15 सप्टेंबरपासून सुरू करण्याबाबत चर्चा झाली. पहिल्या टप्प्यात प्रात्यक्षिक व त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार असून . या परीक्षा ऑनलाइन घेण्याबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी तयारी दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अरे बापरे! गणपती आरतीसाठी एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची लागण

राज्यातील विद्यापीठांनी परीक्षा कशा घ्याव्यात याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने समिती नेमून परीक्षांसाठी कार्यक्रम तयार केला आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांचा पर्याय स्वीकारल्याचे समजत आहे. प्राचार्यांचे मत जाणून घेण्यासाठी शनिवारी मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन बैठकीचे आयोजन केले होते. सध्या बहुतांश महाविद्यालयात ऑनलाइन व्याख्याने सुरू आहेत. तसेच बहुतांश विद्यार्थी याला उपस्थित असतात असे महाविद्यालयांनी सांगितले. यावरून परीक्षाही शक्य होऊ शकतील असेही मत काही प्राचार्यांनी यावेळी मांडले. विद्यापीठाने 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा तर 1 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन लेखी परीक्षा पूर्ण करण्याचे ध्येय प्राचार्यांना दिले आहेत. यानंतर 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर करण्यात येईल असा विश्वासही कुलगुरुंनी या बैठकीत व्यक्त केला आहे.

ऑनलाइन परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्नांची असेल तसेच नेहमीपेक्षा निम्म्या गुणांच्या आधारे मूल्यांकन केले जाईल असेही या बैठकीत ठरविण्यात आले. याबाबत आता परीक्षा मंडळाची बैठक घेऊन पुढील दोन दिवसांत अंतिम मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात येतील असेही यावेळी सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुशांतसिंग राजपुतचा नोकर दिपेश सावंतला एनसीबीकडून अटक

ऑफलाइनचाही पर्याय बहुतांश विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑनलाइनच घेण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही त्यांच्यासाठी ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत कॉलेज स्तरावर निर्णय घेण्यात यावा मात्र त्यासाठी विद्यापीठाने तयार कलेल्या मार्गदर्शक सुचना बंधनकाकर असतील असेही यावेळी सांगण्यात आले.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai University exams from September 15? Colleges prepare for online exams