गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थी अभ्यासक्रमाला मुकणार

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 30 जुलै 2019

विधीच्या विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठात धाव.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने बहुतांश परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत; परंतु त्याच्या गुणपत्रिका अद्यापही विद्यार्थ्यांना दिलेल्या नाहीत. काही अभ्यासक्रमांचे निकाल अद्यापही प्रलंबित आहेत. विधी अभ्यासक्रमाचे अर्ज भरतेवेळी पदवी अभ्यासक्रमाची गुणपत्रिका सादर करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे; पंरतु विद्यापीठाकडून गुणपत्रिका देण्यात विलंब होत असल्याने अनेक विद्यार्थी विधी अभ्यासक्रमाला मुकण्याची शक्‍यता आहे.

वर्ष वाया जाऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठात धाव घेणे सुरू केले असून परीक्षा विभागासह विविध अधिकाऱ्यांना विनवणी करत आहेत. 
राज्यातील तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत ५ ऑगस्टपर्यंत आहे. राज्यातील विविध विद्यापीठांनी पदवी परीक्षांचे निकाल जाहीर केले; परंतु मुंबई विद्यापीठाचे निकाल अद्यापही जाहीर होत आहेत. मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर होत नसल्याने सीईटी सेलने प्रवेश प्रक्रिया सुरू केली नव्हती; परंतु प्रवेश परीक्षा सुरू करण्याबाबत विद्यार्थ्यांकडून तगादा लावण्यात येत असल्याने सेलने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे; तरीही विद्यापीठाच्या काही परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. 

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आवश्‍यक आहे. त्यामुळे गुणपत्रिका न मिळालेले आणि निकालाच्या प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी कलिना संकुलातील परीक्षा भवनात गर्दी करू लागले आहेत. 

धीम्या कारभाराचा फटका
आयडॉलचीही अशीच परिस्थिती असल्याने या ठिकाणीही विद्यार्थी गुणपत्रिकेबाबत विचारणा करत आहेत; परंतु गुणपत्रिका तातडीने मिळणे शक्‍य नसल्याची उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळत असल्याने विद्यार्थ्यांना निराश होऊन परतावे लागत आहे. विद्यापीठाच्या धीम्या कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai university haven't given the marksheet to law student