esakal | विद्यापीठाच्या अनागोंदीचा फटका! MCA च्या विद्यार्थ्यांना "जुनेच धडे'; नव्या अभ्यासक्रमाची प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठाच्या अनागोंदीचा फटका! MCA च्या विद्यार्थ्यांना "जुनेच धडे'; नव्या अभ्यासक्रमाची प्रतीक्षा

बाद झालेला अभ्यासक्रम शिकण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम असून, नाराजीही व्यक्त केली जात आहे. 

विद्यापीठाच्या अनागोंदीचा फटका! MCA च्या विद्यार्थ्यांना "जुनेच धडे'; नव्या अभ्यासक्रमाची प्रतीक्षा

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई - मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांत "एमसीए'ची शिक्षण देणारी महाविद्यालये सुरू होऊन एक महिना उलटला तरीही अद्याप अभ्यासक्रम मात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला नाही. यामुळे बाद झालेला अभ्यासक्रम शिकण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रम असून, नाराजीही व्यक्त केली जात आहे. 

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मागील वर्षी जुलैमध्ये "एमसीए'चा अभ्यासक्रम तीनऐवजी दोन वर्षांचा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम दोनच वर्षांचा ठरवून त्यासाठीची राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून मागील महिन्याभरापूर्वी पूर्ण केली आहे. या प्रवेशानंतर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये 21 जानेवारीपासून प्रात्यक्षिक शिकवण्याही सुरू झाल्या आहेत; मात्र आतापर्यंत दोन वर्षांच्या अभ्यासक्रमांचा अजूनही पत्ता नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक संभ्रमात आहेत.

मुंबई, रायगड, पालघर, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

बसून राहण्यापेक्षा काही महाविद्यालयांमध्ये मागील कालावधीत असलेला तीन वर्षांचा अभ्यासक्रम शिकवला जात आहे. विद्यापीठाच्या या अनागोंदीचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. हा अभ्यासक्रम पोचला नसल्याने याविषयी तातडीने कार्यवाहीसाठी मुंबई युनिव्हर्सिटीज कॉलेज टीचर असोसिएशनने कुलगुरूंना पत्र देऊन विचारणा केली होती; मात्र त्यावर समाधानकारक उत्तर संघटनेला मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. 

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एमसीएचा अभ्यासक्रम दोन वर्षांचा करण्याचे ठरवून आज अर्धे वर्ष संपले आहे. असे असताना विद्यापीठाकडून त्यासाठीचा अभ्यासक्रम आणि तयारी केली जाऊ नये ही मोठी शोकांतिका आहे. महिनाभरापासून विद्यार्थ्यांना जर जुनाच अभ्यासक्रम शिकण्याची वेळ आली असेल तर यासंदर्भात जबाबदार विद्यापीठाच्या अभ्यास मंडळासोबतच विद्यापीठाच्या उच्चस्तरीय जबाबदार असलेल्यांवरही कारवाई केली जावी. 
- प्रा. सुभाष आठवले,
अध्यक्ष, मुक्‍टा संघटना 

एमसीएचा अभ्यासक्रम कधीच तयार झाला आहे. यासाठी संबंधित विभागप्रमुखांना त्याची माहितीही दिली आहे. विद्यापीठाने अभ्यासक्रम तयार करण्यासाठी चोख भूमिका बजावली आहे. शिवाय त्याला विद्यापीठाच्या अभ्यास मंडळात मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे कुठेही अभ्यासक्रमाची अडचण राहिली नाही. काही अपलोडच्या अडचणी असतील त्याही लवकरच सोडवल्या जातील. 
- प्रा. पूजा रौंदाळे,
संचालक, एमसीए, अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai university marathi latest MCA students old lessons waiting new course