मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडले; विद्यार्थ्यांचा संताप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

जुलै महिना संपत आला तरी मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नसल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्रातील विविध परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. जुलै महिना संपत आला तरी विद्यापीठाकडून निकाल जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नियमानुसार परीक्षेनंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे बंधनकारक असतानाही विद्यापीठाकडून निकाल जाहीर न केल्याने प्रशासनाने विद्यापीठ कायद्याचाही भंग 
केला आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या एकूण ७३१ परीक्षांपैकी १७५ परीक्षा महाविद्यालय पातळीवर; तर ४३८ परीक्षा विद्यापीठामार्फत घेण्यात येतात. विद्यापीठाने आतापर्यंत २२५ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यात पदवी स्तरावरील प्रमुख अभ्यासक्रमांचा समावेश आहे. मात्र, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल अद्यापही जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई विद्यापीठातून इतर विद्यापीठांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची निकाल न लागल्याने कोंडी झाली आहे.

विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षेनंतर ४५ दिवसांमध्ये निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे; परंतु परीक्षा होऊन ४५ दिवसांचा अवधी लोटूनही ११३ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. यामध्ये विधी शाखेसह अनेक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विधी अभ्यासक्रमांचे निकाल दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai university result delay