मुंबई विद्यापीठाला तंत्रज्ञानाचा आळस ; महाविद्यालयांच्या वाढत्या स्वायत्ततेवर सिनेट सदस्यांची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसत असल्याने संलग्न महाविद्यालयांचा स्वायत्ता मिळवण्याकडे कल वाढत आहे; मात्र महाविद्यालयांना स्वायत्ततेचा विचार करण्यास मुंबई विद्यापीठच कारणीभूत आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसत असल्याने संलग्न महाविद्यालयांचा स्वायत्ता मिळवण्याकडे कल वाढत आहे; मात्र महाविद्यालयांना स्वायत्ततेचा विचार करण्यास मुंबई विद्यापीठच कारणीभूत आहे. आळस न करता तंत्रज्ञानाची कास धरा तरच या संकटातून बचाव होऊ शकतो, असा सल्ला सिनेटने विद्यापीठाला दिला आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर सर्वच 10 सदस्य युवा सेनेचे निवडून आले आहेत. सिनेटच्या वार्षिक बैठकीत या सदस्यांनी विद्यापीठाला चांगलेच धारेवर धरले. विद्यापीठाची ढासळती प्रतिमा ही चिंतेची बाब असल्याने यावर उपाययोजना म्हणून अनेक महाविद्यालये आता स्वायत्त होण्याच्या मार्गावर आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रश्‍न सिनेट सदस्य प्रवीण पाटकर यांनी शनिवारी (ता. 31) बैठकीत उपस्थित केला. विविध गोष्टींवरील उपाययोजनेसाठी जुन्या पद्धती दूर ठेवा, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत महाविद्यालयांना आकर्षित करा, असा सल्ला पाटकर यांनी या वेळी दिला. 

विद्यापीठाअंतर्गत असलेल्या 14 महाविद्यालयांना यापूर्वीच स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. पाचहून अधिक महाविद्यालये स्वायत्त होण्याच्या मार्गावर आहेत. सगळीच महाविद्यालये स्वायत्त झाली तर या महाविद्यालयांवर विद्यापीठाचा अंकुश राहणार नाही. परिणामी, अवाजवी शुल्क वाढीचीही भीती पाटकर यांनी व्यक्त केली. यावर प्रतिबंधासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन टेक्‍नोसेव्ही कार्यक्रम राबवावेत जेणेकरून मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत विद्यार्थी संख्या अबाधित राहील, असेही पाटकर म्हणाले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यापीठ पुढाकार घेईल, असे आश्‍वासन या वेळी मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दिले. 

ऍप्लिकेशनसाठी बजेटमध्ये तरतूद 

मुंबई विद्यापीठाचा निकाल, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम आदींच्या माहितीसाठी मुंबई विद्यापीठाने ऍण्ड्रॉईड आणि आयफोनसाठी मोबाईल ऍप्लिकेशन तयार करावे, अशी मागणीही या वेळी पाटकर यांनी केली. आयडॉलसाठी ही तरतूद असल्याचे त्यांनी लक्षात आणले. यावर मुंबई विद्यापीठानेही होकार दिला आहे. त्यामुळे ऍप्लिकेशनसाठी बजेटमध्येही विशेष तरतूद केली जाणार आहे. 

Web Title: Mumbai University Technology Senate Member Demands