मुंबईत प्रवास करताना बॅगा ठरताहेत जीवघेण्या!

In Mumbai the victim of locals was found responsible for the bags hanging on the back of the passengers
In Mumbai the victim of locals was found responsible for the bags hanging on the back of the passengers

मुंबई - मुंबईत सातत्याने लोकलगर्दीचे बळी जात असून, त्याला रेल्वेची अपुरी सेवा तर कारणीभूत आहेच; परंतु प्रवाशांच्या पाठीवर वा पोटावर लटकलेल्या बॅगाही काही प्रमाणात जबाबदार असल्याचे निदर्शनास आले आहे. लोकलच्या एका डब्यातील सुमारे शंभर प्रवाशांची जागा या बॅगा अडवत असल्याचे एका गणितानुसार स्पष्ट झाले आहे. मात्र, लोकल प्रवाशांकडील या बॅगा म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा असल्याने त्यांस योग्य पर्याय शोधण्याची आवश्‍यकता निर्माण झालेली आहे.

रेल्वेच्या आकडेवारीनुसार गतवर्षी धावत्या रेल्वेतून पडून ७११ जणांचा मृत्यू झाला होता. लोकलमध्ये सातत्याने वाढत चाललेल्या गर्दीचे हे बळी आहेत. एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका लोकलची माणसे वाहून नेण्याची किमान मर्यादा १७०० आहे. 

एका डब्यात १६६ प्रवासी प्रवास करू शकतात. परंतु सध्या गर्दीच्या वेळी एक लोकल सुमारे साडेचार हजार प्रवासी वाहून नेते. याचा अर्थ गर्दीच्या वेळी एका टेलिफोन बूथएवढ्या जागेत १४ ते १६ प्रवासी कोंबलेले असतात. याला प्रवासी वाहतूक क्षेत्रात ‘सुपर डेन्स क्रश लोड’ असे म्हणतात. हा ‘लोड’ दिवसेंदिवस वाढतच चालला असून, रेल्वे प्रवाशांकडील ‘सॅक’ त्यात भरच घालत असल्याचे वाहतूक क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

वर्दळीच्या वेळी एका डब्यातून प्रवास करणाऱ्या सुमारे चारशेपैकी दोनशे जणांकडे अशा बॅगा असतात. ही बॅग साधारणतः सहा इंच रुंद आणि एक ते दीड फूट उंच असते. एका व्यक्तीला आरामदायी पद्धतीने उभे राहण्यासाठी कमाल दीड फूट जागा लागते, असे गृहीत धरल्यास दोन बॅगा मिळून एका प्रवाशाची जागा व्यापतात असे दिसते. याचाच अर्थ एका डब्यातील दोनशे प्रवाशांच्या दोनशे बॅगा मिळून १०० जणांची जागा खातात. त्यामुळे त्या आपसूकच आजूबाजूची जागा व्यापतात. त्या पायाजवळ धरल्यास यात थोडातरी फरक पडेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

का वापरतात लोक या बॅगा?
एकाच खांद्यावर वजन आल्यास खांदा, पाठीचा मणका आणि मानेला त्रास होतो. दोन्ही खांद्यावर मिळून जास्तीत जास्त चार ते पाच किलो वजन मणका पेलू शकतो. एकाच खांद्यावर बॅग वापरण्याच्या सवयीमुळे होणाऱ्या त्रासाचे रुग्ण वाढले आहेत. त्यात खासकरून कॉलेजचे विद्यार्थी आहेत, अशी माहिती जे जे रुग्णालयातील अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार यांनी दिली. एकंदर हा पाठीचा-मानेचा त्रास टाळण्यासाठीच लोक या सॅक वापरत असतात.

गाडी खच्चून भरलेली असते. दरवाजावरील गर्दी आणि त्यात त्यांच्या बॅगा यामुळे गाडीत चढणेच अशक्‍य होऊन जाते. या गर्दीमुळे माझा अपघात होता होता वाचला आहे. 
- तेजश्री यादव, प्रवासी

माझ्या बॅगमध्ये नेहमी लॅपटॉप असतो. त्यामुळे मला पाठीचा त्रास होतोच; पण लोकलच्या गर्दीत अधिकच त्रास सहन करावा लागतो. मी रॅकमध्ये बॅग ठेवतो, पण इतरांच्या बॅगांमुळे धक्काबुकी होतेच. - राहुल पाटील, दिवा 

पावसाच्या वेळी लोकलमध्ये चढ-उतार करताना खूप त्रास सहन करावा लागतो. लांबचे प्रवासी आधीच बॅग ठेवून जागा अडवतात. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये चढताना एक बाजू पूर्ण बंद करतात. त्यावेळी बॅगेची जास्त अडचण होते. अशा वेळी चढ-उतार करताना एकमेकांच्या बॅगांत
अडकायला होते. 
- हर्षाली मोहिते, कळवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com