Mumbai : गोराईतील कुळवेम पाणथळ जागा वाचवण्यासाठी ग्रामस्थांचे पंतप्रधानांना साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

Mumbai : गोराईतील कुळवेम पाणथळ जागा वाचवण्यासाठी ग्रामस्थांचे पंतप्रधानांना साकडे

मुंबई - गोराई जवळील कुळवेम गावातील पाणथळ जागेचे पालिकेने सुशोभीकरण सुरू केले आहे तर येथे असलेल्या जुनी विहीर आणि रहाट तोडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.गावठाणांची ओळख असणारा हा परिसर वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी पंतप्रधान कार्यालयाकडे साकडे घालत तलाव आणि रहाट (विहीर) वाचवण्याचे आवाहन केले आहे.

सुशोभीकरणाच्या नावाखाली गोराई गावातील कुळवेम तलावाचे बेकायदेशीर काम सुरू असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.या कामासाठी अवजड मशिनरींचा वापर करून उत्खनन सुरू आहे. यामुळे या पाणथळ जागेला धोका निर्माण झाला असून नष्ट होणाच्या मार्गावर आहे. याविरोधात पर्यावरणप्रेमी संस्थांनी विरोध केला आहे. 

कुळवेम ही गोड्या पाण्याची पाणथळ जमीन आहे.सद्या या जागेवर उत्खनन सुरू असून तलावात खोदकाम केले जात आहे.त्यातून काढण्यात आलेले मातीचे मोठे ढिगारे पाणथळ जागेच्या आसपास टाकण्यात आले आहेत. या पाणथळ जागेवर अनेक प्राणी आणि पक्षी पाणी पिण्यासाठी येत होती.

सध्या सुरू असलेल्या कामामुळे त्यांना ही अडथळा निर्माण झाला आहे. या जागेचे सुशोभीकरण झाल्यानंतर कदाचित हे प्राणी-पक्षी अशा जीव जंतूंना या ठिकाणी येण्यापासून मज्जाव केला जाईल. यामुळे पाणथळ परिसरातील जैवविविधता धोक्यात आली आहे असे वॉचडॉग फाउंडेशन प्रमुख गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले.

या प्रकाराविरुद्ध वनशक्ती संस्थेने रीतसर तक्रार दाखल केली. पण अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही.आता गावठाणांमध्ये ग्रामस्थांच्या या विरोधात लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. राज्य सरकार,पालिका प्रशासन किंवा महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यात लक्ष घालत नसल्याने ग्रामस्थांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घालण्याचे ठरवले आहे.

यासाठी ग्रामस्थांनी आपल्या भावना पोचवणारे पत्र लिहिले असून आतापर्यंत १०० पत्र लिहून पाठवण्यात आले आहेत. याची दखल घेऊन पंतप्रधान आम्हाला न्याय देखील अशी अपेक्षा असल्याचे पिमेंटा म्हणाले.

कुळवेम गावठाणामध्ये दीडशे ते दोनशे वर्षे जुना रहाट आहे. तो आता ही सुस्थितीमध्ये आहे. त्या खाली विहीर असून ती आता ही सुस्थितीमध्ये असून तिचे पाणी वापरण्या जोगे आहे. तर पशु-पक्ष्यांच्या दृष्टीने पाणथळ जागा महत्वाची असून जैवविविधता टिकवण्यासाठी ही जागा वाचवणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.