VIDEO: लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात प्रवाशांचे आंदोलन

विजय गायकवाड
Monday, 7 September 2020

आठवड्याच्या आज पहिल्याच दिवशी, संतप्त प्रवाशांनी लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात तीव्र आंदोलन केले आहे. बस वेळेवर सुटत नाहीत, बसचा तुटवडा असल्यानं तासनतास रांगेत थांबून सुद्धा वेळेवर कामावर पोहचता येत नाही.

मुंबईः  आठवड्याच्या आज पहिल्याच दिवशी, संतप्त प्रवाशांनी लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात तीव्र आंदोलन केले आहे. बस वेळेवर सुटत नाहीत, बसचा तुटवडा असल्यानं तासनतास रांगेत थांबून सुद्धा वेळेवर कामावर पोहचता येत नाही. कामावर वेळेत पोहोचले नसल्यानं नोकरी गमवावी लागतेय. त्यामुळे शेकडो  संतप्त प्रवाशांनी विरार  रेल्वे स्थानकाच्या आवारात जमून तीव्र आंदोलन केले आहे. आज सकाळी ९ ते १०.३० वाजेपर्यंत प्रवाशांनी आंदोलन केले आहे. शेवटी रेल्वे आणि विरार पोलिसांनी प्रवाशाना समजावून सांगत विरार बस आगारातून बस सोडून प्रवाशांचे आंदोलन शांत करण्यात यश मिळवलं आहे. यावेळी हजारो प्रवासी यावेळी घोषणा देत रेल्वे रुळावर आणि परिसरात उतरले होते.

 

उपनगरीय रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे.  लॉकडाऊनच्या काळात ज्यांचे हातावर पोट आहे अशा सर्वसामान्य गरिब-गरजू, कामगार, खाजगी नोकरदार यांचे पूर्णपणे हाल सुरू झालेत. गेल्या दोन महिन्यांपासून अनलॉकमध्ये शासकीय आणि आपत्कालीन व्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं लोकल ट्रेन सुरू केली आहे. अनेक खाजगी कंपनी सुरू झाल्या आहेत. सामान्य प्रवाशांसाठी बस सेवा सुरू आहे. पण या बस सेवेत सुद्धा कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही. यावेळी प्रवाशी रुळांवर उतरले आणि उपनगरीय रेल्वे सुरू करा…अशी मागणी करत त्यांनी घोषणा दिल्या. . काही वेळाने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

त्यात तिकिटाचे दर दुप्पट केलेत. पगार कपात सुरू आहे. पण अशावेळी सुद्धा शेवटी संसाराचा गाडा हाकण्यासाठी स्वतः च्या खिशाला आर्थिक कात्री लावून, जीव धोक्यात घालून कामावर पोहोचावे लागत आहे. लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी नसल्यानं प्रवाशांचे हाल सुरू झालेत. आमच्यासाठीही लोकल ट्रेन सुरू करावी अशी मागणी प्रवाशी करत आहेत. पण वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सरकार लोकल ट्रेन सामान्य प्रवाशांना सुरू करत नाही आहे.  कोरोनानं मरण्यापेक्षा आता हाल अपेष्टा सहन करून मरावं लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी देताहेत. बसेसमध्ये गर्दी असल्यानं कोरोना संसंर्गाचाही धोका असतो, असेही आंदोलक प्रवाशांनी सांगितले.

 

 यापूर्वी २२ जुलैला देखील नालासोपारा रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी आंदोलन केले होते.

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai Virar Station Railway Passenger Angry Protest On Track


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Virar Station Railway Passenger Angry Protest On Track