मुंबईकरांचे पाणी रोखणार!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

तीन वर्षांत ना बैठक ना चौकशी!
गेल्या तीन वर्षांत शहापूरच्या पाणीप्रश्‍नासंदर्भात साधी बैठक झाली नाही किंवा चौकशी. आम्ही पाच दिवस भरउन्हात पायी चालून आपल्यापर्यंत शहापूर तालुक्‍याचा महत्वाचा पाणी प्रश्‍न घेऊन आलो, त्याची आपण दखलसुद्धा घेतली नाही, ही खंत आहे. नागरिक मुंबईचे पाणी रोखतील आणि जलवाहिनी फोडून टाकतील, त्यावेळी होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी आपली राहील, असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे जलदिंडीचे प्रणेते संतोष शिंदे यांनी दिला आहे.

मुंबई - पाणीप्रश्‍नासंदर्भात शहापूर ते मंत्रालय अशी पायी जलदिंडी काढली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहापुरातील पाणीप्रश्‍नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, ते आश्‍वासन कागदावरच राहिल्याने शहापुरकरांनी आता आक्रमक बनण्याचा पवित्रा घेतला आहे. पाणीप्रश्‍नावर वेळीच कार्यवाही केली नाही तर लोकांच्या संतापाचा भडका उडून जलवाहिनी फोडली जाईल, नागरिक मुंबईचे पाणी रोखतील, असा इशारा जलदिंडीचे प्रणेते, शिवसेनेचे नेते संतोष शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

शहापूर तालुक्‍याला पाणी द्या, या मागणीसाठी तीन वर्षांपूर्वी लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तळपत्या उन्हात शहापूर ते मंत्रालय अशी पायी जलदिंडी घेऊन गेले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे मागण्या मांडल्या होत्या. पण तीन वर्षांनंतरही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन कागदावरच राहिल्याने संतोष शिंदे यांनी खंत व्यक्‍त केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील हे उपस्थित होते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी आपण एका महिन्यात बैठक घेऊन यावर उपाय काढू, असे आश्‍वासन दिले होते. शहापूर तालुका मुंबई महापालिकेने दत्तक घ्यावा आणि मुंबईला पाणी दिले जात असलेल्या भातसा, तानसा, वैतरणा या धरणांतून आमच्या टंचाईग्रस्त गावांना पाणी द्यावे, अनेक वर्षांपासून ज्या पाणीयोजना रखडल्या आहेत, त्यातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, आदी मागण्यांकडे त्यावेळी लक्ष वेधण्यात आले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र, तीन वर्षांनंतरही परिस्थिती जैसे थे असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

Web Title: Mumbai Water Stop Santosh Shinde