मुंबईचे ‘केरळ’ होईल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मुंबई - तब्बल ९० वर्षांतील सर्वाधिक गंभीर पूरस्थितीने भयाण झालेल्या केरळ राज्यासारखी मुंबईची अवस्था होऊ शकेल काय? मुंबईत घरबांधणीसाठी मिठागरांच्या मोकळ्या जमिनींचा वापर होणार असेल, तर या प्रश्‍नाचे उत्तर निर्विवादपणे ‘होय’ असेच आहे, असे नगररचना क्षेत्रातील जाणकार सांगतात.

मुंबई - तब्बल ९० वर्षांतील सर्वाधिक गंभीर पूरस्थितीने भयाण झालेल्या केरळ राज्यासारखी मुंबईची अवस्था होऊ शकेल काय? मुंबईत घरबांधणीसाठी मिठागरांच्या मोकळ्या जमिनींचा वापर होणार असेल, तर या प्रश्‍नाचे उत्तर निर्विवादपणे ‘होय’ असेच आहे, असे नगररचना क्षेत्रातील जाणकार सांगतात.

पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहातील अडथळे हे केरळमधील पुराचे महत्त्वाचे कारण मानले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत परवडणाऱ्या घरांसाठी ६०० एकर मिठागरांचा वापर करणे भविष्यात घातक ठरू शकते, असा इशाराच जाणकार देत आहेत. मोकळ्या मिठागरांवर बांधकाम करताना नाल्यांची पावसाळी पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवली जाणार नाही, यावरही ते चिंता व्यक्त करत आहेत.

पालिकेच्या २०१४ ते २०३४ या २० वर्षांच्या विकास आराखड्यात ६०० एकर मिठागरांवर परवडणाऱ्या घरांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. यातील २५ टक्के जमीन मोकळी सोडावी लागणार आहे. म्हणजे ६०० एकरपैकी अवघी १२५ एकर जमीन मोकळी राहणार आहे. क्षमतेपेक्षा चौपट ते पाचपट पाणी कोणतीही जमीन शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची क्षमता कमी पडेल, अशी भीती आहे.

मिठागरांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जैव साखळी आहे. त्याचबरोबर मिठागरांमध्ये पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची मोठी क्षमता आहे. त्यामुळे घरबांधणीचा निर्णयच चुकीचा आहे, असे मत नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्‍त केले. मिठागरांवर इमारती उभ्या राहिल्यास २००५ मध्ये मुंबईची जी अवस्था झाली होती, त्यापेक्षाही भीषण अवस्था होण्याची भीती अभ्यासक डेबी गोयंका यांनी व्यक्त केली. मिठागरांवर बांधकामे झाल्यास पाण्याच्या निचऱ्याची समस्या निर्माण होईल, असेही नमूद केले.

कळीचा मुद्दा
मुंबईत ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नाल्यांतून तासाला ५० मिलिमीटर पावसाचे पाणी वाहून नेता येईल. मिठागरांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते; मात्र तेथे बांधकाम झाल्यास ते नाल्यांतून खाडीत सोडावे लागणार आहे. त्यामुळे नाल्यांच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह लागणार आहे.

मिठागरे कुठे? 
पूर्व उपनगर : मुलूंडपासून घाटकोपरपर्यंत. चेंबूर, तुर्भे, मंडाले, आणिक. 
शहर विभाग : आणिक, वडाळा. 
पश्‍चिम उपनगर : मालाड-मालवणी, दहिसर.

Web Title: Mumbai will be Kerala